उद्धव ठाकरे डझनभर नेत्यांना घेऊन गेले पण अर्ध्यात परतले! शिंदे गट भारी पडला

ठाणे – उद्धव ठाकरे गटाच्या मुंब्रा येथील शाखेवर बुलडोझर फिरवला गेल्यानंतर मोठा गाजावाजा करीत, डझनभर ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन जितेंद्र आव्हाडांची ताकदही पाठीशी घेत उद्धव ठाकरेंनी पहिल्या आक्रमणाचा पवित्रा घेत मुंब्रा गाठले, पण त्यांना अर्ध्यातून परतावे लागले! शिंदे गटाचे एकटे नरेश म्हस्के आपल्या कार्यकर्त्यांसह शाखेबाहेर पाय रोवून उभे ठाकले आणि ते सर्वांना भारी पडले! उद्धव ठाकरेंनी या अपयशाचे खापर पोलिसांवर फोडले. निवडणुकीत मस्ती उतरवणार असे आव्हान केले, पण शेवटी शाखेत न जाताच त्यांना परतावे लागले हीच चर्चा होत आहे.
उद्धव ठाकरे मोठा ताफा घेऊन मुंब्र्याला निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व ज्येष्ठ नेते होते. जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यात ताकद लावली होती. उबाठाचे कार्यकर्ते रस्त्यावर ताकदीने उतरले होते. पण मुंब्र्याच्या शाखेच्या समोर जाऊन उद्धव ठाकरे मागे फिरले. त्यानंतर त्यांनी जवळच उभारलेल्या व्यासपीठावरून भाषण करीत म्हटले की, ही आमची शाखा आहे. माझे सर्व शाखाप्रमुख उद्यापासून रोज इथे बसतील. खोके सरकारने आमच्या जागेवर खोका ठेवला आहे. तो आम्ही उचलून फेकून देऊ. पोलीस बाजूला ठेवून समोर या, आमची ताकद दाखवतो.
परंतु नियोजन करून केलेला हा दौरा आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड आवेश असूनही उद्धव ठाकरे शाखेत जाऊन शकलेच नाहीत. त्यांना परतावे लागले. त्यामुळे यापुढील काळात अशा संघर्षात कोण सरशी करतो याकडे सर्वांचे लक्ष राहील. उद्या उबाठाचे शाखाप्रमुख शाखेत जाऊन बसू शकतील, असे सध्याचे तरी चित्र नाही.
मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा बुलडोझरने पाडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात सुरू झालेला वाद आज शिगेला पोहोचला. उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा दौरा जाहीर करून संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्यासह मुंब्र्याकडे प्रयाण केले. तेव्हा ठाण्याच्या वेशीवर त्यांचे राजन विचारेंनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड रेती बंदर येथे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी दोन जेसीबी भरून फुले घेऊन सज्ज होते. मुंब्रा हा त्यांचा बालेकिल्ला असल्याने त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिथे स्वागत स्वीकारून उद्धव ठाकरे पुढे निघाले.
त्याच वेळी त्यांना विरोध करण्यासाठी शिंदे गट सक्रिय झाला होता. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के हे पाडलेल्या शाखेसमोरच खुर्ची टाकून बसले होते. त्यांच्या सोबत हजारो कार्यकर्ते होते. नरेश म्हस्के म्हणत होते की, हे कुणाला जाब विचारायला येत आहेत? मुंब्र्यातील 99 टक्के शिवसैनिक शिंदे गटाकडे आहेत. या शाखेची पुनर्बांधणी होत आहे. त्याचा बोर्डही लावला आहे. ही शाखा बुलडोझरने पाडलेली नाही. आम्ही इथे आमच्या शाखेपाशी बसलो आहोत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने आरोप केला की, ही शाखा भंगारवाल्याला देऊन त्याचे भाडे खात होते. आता ते भाडे बंद झाल्याने संजय वाटोळेंच्या पोटात दुखते आहे. त्यांना प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, ते आम्हाला अडवू शकत नाहीत. आम्ही त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहू. ज्यांनी बुलडोझर फिरवला ते अफझल खान आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखेजवळ होते, तर दुपारनंतर समोरच्या फूटपाथवर उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते
जमा झाले.
दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले असताना पोलिसांनी प्रथम 144 कलमची नोटीस काढून उद्धव ठाकरेंना येण्यास मनाई केली. नंतर ही नोटीस मागे घेण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे पोस्टर फाडण्यात आले तेव्हा पोलीस गप्प उभे होते, असा आरोप आव्हाडांनी केला. एकूण तणाव लक्षात घेऊन 500 पोलीस शाखेजवळ तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी मध्यम मार्ग काढून मुंब्रा वेशीवर व्यासपीठ उभारून तिथूनच उद्धव ठाकरे व जितेंद्र आव्हाड यांची भाषणे होतील अशी व्यवस्था केली होती. या व्यासपीठापासून जवळच वादग्रस्त शाखा होती.
उद्धव ठाकरेंचा ताफा शाखेजवळ येऊ लागला असतानाच पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. मिलिंद नार्वेकर गाडीतून उतरून चालत पुढे गेले. उद्धव ठाकरेंचा ताफा शाखेजवळ आला. उद्धव ठाकरेंचे नेते कार्यकर्त्यांशी व पोलिसांशी चर्चा करू लागले. त्याचवेळी शिंदे गटाने काळे झेंडे दाखवत ‘उद्धव ठाकरे परत जा’ अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही गटाच्या मध्ये बॅरीकेड होते. उद्धव ठाकरे गाडीतच बसून होते. पंधरा मिनिटांच्या चर्चेनंतर गाडी पुढे शाखेच्या दिशेने निघाली. शाखेच्या काही मीटर अंतरावर गाडी पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गाडीतून उतरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top