उध्दव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांचा हेतू काय? मशाल विझविणार का?

मुंबई- शरद पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय गुगली फेकून नव्या चर्चेला तोंड फोडले. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करतील. त्यातील काही काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेस व आमच्यात वैचारिक फरक नाही. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आणि खळबळ माजली. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांबरोबर उध्दव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशी शंका निर्माण झाली आहे. याचा उध्दव ठाकरे गटाला पुढील दोन टप्प्यांच्या मतदानात फटका बसू शकतो. त्यामुळे शरद पवारच उध्दव ठाकरे गटाला संपवायला निघाले आहेत, असा संशय व्यक्त होत आहे .
लोकसभेची निवडणूक सुरू असताना शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शरद पवार यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण झाला आहे.शरद पवार यांना उद्धव ठाकरेंची मशाल विझवायची आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात उत्पन्न झाली. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अद्याप शिल्लक असताना पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मतदारांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या गटाबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने ते त्यांना मतदान करणार नाहीत. परिणामी उध्दव ठाकरे यांचे अनेक उमेदवार पडतील आणि तसे झाले तर मशालच विझेल अशी भीती आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाला घातक ठरणारे वक्तव्य शरद पवारांनी नेमके का केले हा प्रश्न आहे.
साताऱ्यात बोलताना पवार यांनी म्हटले की नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे राजकारण पचनी पडणे बहुतांश प्रादेशिक पक्षांना कठीण वाटते. त्यामुळे मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेससारख्या मोठ्या छत्राखाली एकत्र यावे, अशी प्रादेशिक पक्षांची भावना तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील. काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होतील. काँग्रेस आणि आमच्या पक्षाचा विचार एकसारखाच आहे. काँग्रेस गांधी-नेहरू यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आमचा पक्षदेखील गांधी-नेहरूंच्याच विचारांवर चालणारा आहे. उध्दव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय पक्षातील सर्वांशी चर्चा करूनच घेता येईल. आपण एकटेच हा निर्णय घेणार नाही, असे शरद पवार म्हणाले .
देशभरातील अन्य प्रादेशिक पक्षांबद्दल बोलताना पवार म्हणाले की, समाजवादी पार्टी (सपा), राष्ट्रीय जनता दल (राजद), लोक जनशक्ती पार्टी (लोजपा), वायएसआर काँग्रेस, तेलगु देसम पार्टी (टीडीपी) आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) यांसारख्या प्रादेशिक पक्षांचे संस्थापक नेते आता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना आपला वारसा आपल्या मुला-मुलींच्या हाती सोपवायचा आहे. हे नेतृत्व तरुणांचे आहे. त्यांना राहुल गांधी यांच्याशी जुळवून घेणे सोपे वाटते. देशात 1977 साली जनता पार्टीबाबत जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यावेळी जनता पार्टीने निवडणुकीच्या आधी पंतप्रधानपदाचा चेहरा दिला नव्हता. निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर सर्व सहमतीने मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. त्यावेळी मोरारजी देसाई यांना जेवढी पसंती होती त्याहून कितीतरी पट जास्त पसंती सध्या राहुल गांधी यांना मिळत आहे, असेही पवार म्हणाले.
यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी मला सांगितले की, देशाच्या पातळीवर ही चर्चा सुरू आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार हे गांधी विचारायचे आहेत. देवेंद्र फडणवीस टोला लगावत म्हणाले की शरद पवार गट विलीन करण्याचा त्यांचा विचार असेल. आजवर त्यांनी अनेक पक्ष स्थापन केले आणि विलीन
केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top