उबाठाचा बडगुजर सलीम कुत्ताबरोबर नाचला राणेंनी फोटो दाखवला! आता चौकशी

नागपूर- भाजपचे आमदार नितेश राणेंनी आज विधान भवनात पुन्हा उबाठा गटाला लक्ष्य केले. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील जन्मठेपेचा आरोपी सलीम कुत्ता आणि उबाठा गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पार्टीत एकत्र नाचत असल्याचे फोटो नितेश राणेंनी सभागृहात झळकवला. बडगुजर आणि कुत्ता यांचा व्हिडिओही व्हायरल झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा केली. संध्याकाळी बडगुजर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही फोटो-व्हिडिओ दाखवून या पार्टीला भाजपचे नेते गिरीष महाजन उपस्थित असल्याचा दावा केला.
आज विधानसभा सभागृहात सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजरचे एकत्र फोटो दाखवत नितेश राणे म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणारा सलीम कुत्ता पॅरोलवर होता. त्याला कोर्टाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. त्याने पॅरोलच्या शेवटच्या दिवशी पार्टी दिली. या पार्टीत उबाठा पक्षाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हजर होता. या पार्टीत दोघेही एकत्र नाचले. माझ्याकडे या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजरचा संबंध काय? सुधाकर बडगुजरला कोणाचा वरदहस्त आहे? त्याला हिंदुत्ववादी असणार्‍या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेल्या माणसासोबत उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी पार्टी करत असतील, तर हे कसले बाळासाहेबांचे वारसदार? असा सवाल नितेश राणेंनी केला.
शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणार्‍याला संरक्षण देणार्‍यांना समोर आणा. बडगुजरला नुसता अटक करू नका, तर त्याचा राजकीय गॉडफादर कोण आहे. तो कोणाच्या संपर्कात असतो. कोणाशी त्याचा दूरध्वनीद्वारे संवाद सुरू असतो. त्याचा सीडीआर रेकॉर्ड तपासावा, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.
नितेश राणेंनी सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचा एकत्र फोटो दाखवल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसेही आक्रमक झाले. भुसे म्हणाले की, सलीम कुत्ता हा
दाऊदचा शूटर आहे. त्याच्यासोबत पार्टी करणारा सुधाकर बडगुजर काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीसाठी भटकत होता. तो आता शेकडो कोटींचा मालक आहे. बडगुजरला वाचवण्यासाठी कोण फोन करत होते? देशद्रोहीसोबत डान्स पार्टी करणार्‍यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? बडगुजरचे लागेबांधे कोणाशी आहेत? बडगुजर हा छोटा मासा आहे. या प्रकरणाचा सर्व उलगडा करावा. गृहमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अन्यथा काही पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे.
नितेश राणे आणि दादा भुसे यांच्यानंतर भाजप आमदार आशिष शेलारांनीही सभागृहात हा मुद्दा लावून धरला. शेलार म्हणाले की, मविआचे सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टीची सुरुवात झाली. ही गंभीर बाब आहे. 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणार्‍यांना कोण वाचवत आहे? या घटनांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्‍वास वाढतो. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
या तिन्ही नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर देवेंद फडणवीस यांनी निवेदन दिले की, नितेश राणे, दादा भुसे, आशिष शेलार यांनी जो मुद्दा मांडला आहे, तो अतिशय गंभीर आहे. बॉम्बस्फोटात हात असलेल्या आणि देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलिम कुत्तासोबत पार्टी करणे गंभीर बाब आहे. तो पॅरोलवर होता. पॅरोलवर असताना पार्टी करता येत नाही. त्याने पार्टी करायची आणि कोणीतरी पार्टीत जायचे आणि नाचायचे हे अतिशय गंभीर आहे. त्या कुत्ताशी काय संबंध आहे, हेही तपासले जाईल. त्याला कोणाचा वरदहस्त होता का, आशीर्वाद होता का, हे पाहिले पाहिजे. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट दिवसांची मुदत दिली जाईल.
फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळले. ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी योग्य माहिती घेतलेली नाही. त्यांनी माहिती घेतली असती तर असे आरोप केले नसते. 2016 मध्ये वेगळ्या विदर्भासाठी सभा झाली होती. त्या विरोधात आंदोलन केले म्हणून शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी मी 14-15 दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो. त्यावेळी 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीही या जेलमध्ये होते. परंतु याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यांच्याशी माझे संबंध नव्हते आणि यापुढेही असणार नाहीत. केवळ एक कैदी म्हणून तिथे भेट झाली. सार्वजनिक ठिकाणी तो कुठे आला असेल किंवा त्या व्हिडिओची मॉर्फिंगही झाली असेल. मुळात तो पॅरोलवर बाहेर आलाच कसा? फडणवीसच म्हणाले की, गुन्हेगार पॅरोलवर सुटला की, सार्वजनिक जीवनात जाऊ शकतो. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. हा बुद्धीबळाचा खेळ आहे. आरोप चालू राहणार. आम्ही त्याला उत्तर देऊ. परंतु दाऊदबरोबर अनेक लोकांचे फोटो-व्हिडिओ फिरताहेत. प्रफुल्‍ल पटेल यांचे तर इकबाल मिर्चीसमवेत जॉइंट व्हेंचर आहे. आमचे असे कुठलेही जॉइंट व्हेंचर नाही.उलट पालकमंत्र्यांवरच ड्रग प्रकरणात आरोप आहेत. त्यांच्यावर कलंक लागला आहे. आम्ही जिल्ह्यात त्यांच्याशी लढत आहोत. त्यांचा कलंक पुसला जाणार नाही. म्हणून माझ्या विरुद्ध आरोप केले जात आहेत. माझे यासंदर्भात पक्षप्रमुखांशी बोलणे झाले आहे. मी चौकशीत पूर्ण सहकार्य करणार आहे. सत्ताधारी आमदारांच्या बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही काही व्हिडिओ आणि फोटो दाखवले. त्यात मंत्री गिरीष महाजन, विक्रांत चांदवडकर आणि बाळासाहेब सानप असे काही भाजप नेते-कार्यकर्ते दिसत आहेत. अंधारे म्हणाल्या, हे फोटो आणि व्हिडिओ त्याच पार्टीतील आहेत ज्याचे फोटो नितेश राणे यांनी दाखवले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top