उबाठाने ठरवून राडा केला! एकनाथ शिंदेंचा आरोप

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच म्हणजेच गुरूवारी 16 नोव्हेंबरला सायंकाळी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर गेले, घोषणाबाजी केली, धक्काबुक्की केली. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ‘नवाकाळ’च्या प्रतिनिधी नेहा पुरव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विशेष संवाद साधला. सामान्य शिवसैनिक म्हणून बोलताना एकनाथ शिंदे भावुक झाले. हा प्रकार घडायलाच नको होता असे सांगताना आगामी निवडणुकीत आपण याचे उत्तर देऊ हे सांगत त्यांनी ठाकरे गटाला इशाराही दिला.
सामान्य शिवसैनिक म्हणून कालचा जो प्रकार घडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
मुख्यमंत्री – एक सामान्य शिवसैनिक म्हणून खूप वेदना झाल्या. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. कारण दरवर्षी बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात, नतमस्तक होतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आदल्या दिवशी गेलो, नतमस्तक झालो. दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो. पण, इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणे, घोषणाबाजी करणे, महिलांना धक्काबुक्की करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मी एक सामान्य शिवसैनिक म्हणूनच तिथे गेलो होतो. अर्थात खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतीदिनी जाऊन अभिवादन केले तरीही मला कुणी अडवू शकत नव्हते. मात्र तरीही तसे करणे मी टाळले. कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती, पण जाणीवपूर्वक हा राडा केला गेला.
मुख्यमंत्री म्हणून आपण या घटनेची चौकशी करणार का?
मुख्यमंत्री –
पोलीसही तिथे हजर होते. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी सर्वांना आवाहन केले होते. मीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना बाहेर निघायला सांगितले, पण समोरून जो काही प्रकार घडला तो शोभणारा नव्हता. आता मी मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. पोलीस यंत्रणा सज्ज आहे, ते व्यवस्थित हे प्रकरण हाताळतील आणि मी यात हस्तक्षेप करणार नाही. पण मुख्यमंत्री म्हणून राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे ही तर माझी जबाबदारी आहे.
शिवसेना उबाठा आपल्यावर नेहमी ‘बाप चोरला’ असे आरोप करत असते. त्याबद्दल आपल्याला काय वाटते?
मुख्यमंत्री –
जे माझ्यावर ‘बाप चोरला’ असा आरोप करतात त्यांनी 2019 साली वडिलांचे विचार सत्तेसाठी विकून टाकले. याउलट बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे घेऊन चालत आहोत. आम्ही वैचारिक वारस आहोत. बाळासाहेबांनी ज्यांना लांब ठेवले त्यांच्यासोबत तुम्ही साथसंगत केली आणि खुर्ची मिळवली. मग तुम्हाला आमच्यावर बोलायचे अधिकारच काय आहे? बाळासाहेब ही काही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. बाळासाहेबांच्या सोबत लाखो शिवसैनिकांनी काम केले आणि शिवसेना मोठी केली. पक्षासाठी अंगावर अनेक केसेस घेतल्या. याउलट आरोप करणार्‍यांच्या अंगावर किती केसेस आहेत? विचारांबाबत बोलायचे झाले तर त्यांना बाळासाहेबांशी काहीही घेणेदेणे नाही. सत्तेच्या मोहापायी त्यांनी बाळासाहेबांचे विचार खुर्चीला टांगले आणि मुख्यमंत्री झाले. मात्र आयोगाने अधिकृतपणे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिले. 50 कोटींची मागणी त्यांनी सुरुवातीला बँकेकडे केली. पण बँकेने ती नाकारली. मी पहिलेच जाहीर केले होते की, बाळासाहेबांच्या संपत्तीवर आम्ही कधीच दावा करणार नाही. बाळासाहेबांची विचार हीच आमची खरी संपत्ती आहे. तेच आमचे खरे ऐश्‍वर्य आहे. पण त्यांच्यासाठी ते नेमके उलट आहे. अशा लोकांबद्दल आम्ही काय बोलायचे?
आगामी निवडणुकीत याचे उत्तर देणार का?
मुख्यमंत्री –
नक्कीच! कोणी कोणाचा बाप चोरला हे 2024 च्या निवडणुकीत जनताच त्यांना सांगेल आणि नुसती सांगणारच नाही तर पटवून देईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top