उल्हासनगरच्या कोणार्क बँकेवर आरबीआयने लादले अनेक निर्बंध

उल्हासनगर – शहरातील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कठोर कारवाई केली आहे. या बँकेच्या सर्व व्यवहारांवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. मात्र,पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमधील त्यांच्या ठेवींपैकी ५ लाख रुपयांपर्यंतच्या विमा दाव्याची रक्कम काढता येणार आहे.

बँकेच्या बिकट आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या मंगळवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. आरबीआयने घातलेल्या निर्बंधांनुसार, कोणार्क बँक आता नव्याने कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही किंवा चालू कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. तसेच, कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाहीत. आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय कोणार्क बँक आता कोणतेही दायित्व हस्तांतरित करू शकत नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करू शकणार नाही.

‘बँकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता बँकेला बचत किंवा चालू किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेला हात लावता येणार नाही. केवळ कर्जाच्या परतफेडीसाठी रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे आरबीआयने म्हटले आहे. ‘कर्जावरील निर्बंधांचा अर्थ बँकिंग परवाना रद्द झाला असा घेऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ठराविक निर्बंधांसह दैनंदिन व्यवहार सुरू ठेवता येतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top