एकदा नव्हे तर एक हजार वेळा करीन! बॅनर्जींनी पुन्हा उपराष्ट्रपतींची नक्कल केली

नवी दिल्ली – तृणमृलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनजी म्हणाले की, नक्कल करणे हा मूलभूत अधिकार आहे. मी हे एकदा नाही, तर हजार वेळा करीन. गरज पडली तर भविष्यातही करीन.
कल्याण बॅनर्जींच्या या नव्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘नक्कल करणे हा मूलभूत अधिकार आहे. मी हे एकदा नाही, तर हजार वेळा करेन. गरज पडली तर भविष्यातही करीन. तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता, मला मारू शकता, पण ही लढाई आता थांबणार नाही. धनखड स्वत:ला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवतात. मात्र धनखड यांची जोधपूरमध्ये करोडोंची संपत्ती आहे. दिल्लीत आलिशान फ्लॅट आहे. ते दररोज लाखो रुपयांचा सूट घालतात.’
संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या मुद्द्यावरून बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. कल्याण बॅनजी म्हणाले की, इतिहासाच्या पानांवर आपले नाव लिहिण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घाईघाईने संसदेची नवीन इमारत बांधली, परंतु त्या बदल्यात त्यांनी खासदारांच्या सुरक्षेशी तडजोड केली. एका भाजपा खासदाराने त्या २ आरोपींना पास दिले होते. त्याला वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top