बुलढाणा – राज्यातील एसटी कर्मचार्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची एक बैठक नुकतीच बुलढाणा येथे पार पडली.
यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ३ सप्टेंबरपासून राज्यभरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीचे पदाधिकारी म्हणाले की, वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळ हे आशिया खंडात एक नंबरला आहे.या स्थितीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी,यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झाली आहे.२०१६ पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचा आम्हाला आश्वासन दिले.परंतु ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडतील,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.