मुंबई-एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा पुरेसा निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना फक्त ५६ टक्केच पगार दिला जाणार आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ ५० टक्के पगार मिळणार आहे. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांची उर्वरित वेतन रक्कम पुढील दहा दिवसांत जमा केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महामंडळावर अशी नामुष्की ओढवली आहे.
महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे २७७ कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र राज्य सरकारकडून फक्त २७२ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातच मिळालेल्या निधीपैकी ४० कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे. या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पगाराच्या वेळोवेळी होणाऱ्या कपातीमुळे त्यांच्या रोजच्या गरजा भागवणेही कठीण झाले आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







