ऐन दिवाळीत इचलकंरजी शहरात पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर

ऐन दिवाळीत इचलकरंजी शहरात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाणी आलेच नाही. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांची एकदिवसाआड पाणी देण्याची घोषणा हवेत विरली आहे. सलग तीन दिवस शहरात पाणी न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
शहरातील सुळकूड योजना पूर्ण होण्यास काही काळ जाणार आहे, त्यामुळे आमदार आवाडे यांनी सुरुवातीपासूनच गळकी योजना असलेली कृष्णा पाणी योजनेच्या जलवाहिन्या बदलून शहराचे पाणी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अजूनही शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नसून शहराला आठवड्यातून दोन किंवा तीनच दिवस पाणी मिळत आहे. पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. खासदार धैर्यशील माने शहरातील नागरिकांना सुळकूड योजना पूर्ण होईपर्यंत एकदिवसाआड का होईना पाणी देणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पाणी प्रश्नावरुन माजी खासदार राजू शेट्टी यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला होता. आता सुळकूड योजना मंजूर झाली असली,तरी या योजनेमुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या योजनेमुळे एकदिवसाआड तरी पाणी मिळणार काय? अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top