ऑस्ट्रेलियाच्या मार्शचा माज हातात बीअर, ट्रॉफीवर पाय

अहमदाबाद – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करून सहाव्यांदा क्रिकेट विश्‍वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातला एक फोटो पाहून क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श विश्‍वचषकावर पाय ठेवून बसल्याचे दिसत आहे. हे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू खरेच विश्‍वचषकच्या पात्रतेचे आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
मिचेल मार्शचा हा फोटो स्वतः ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर मार्शनेही तो फोटो रिपोस्ट केला. तसेच तो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर झाला आहे. या फोटोमध्ये मार्श एका सोफ्यावर बसला असून, त्याने विश्‍वचषक ट्रॉफीवर पाय ठेवले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने विश्‍वचषक उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तो पाहून भारतीय क्रिकेटप्रेमी संतप्त झाले आहेत. त्यांनी यावर खरमरीत प्रतिक्रिया देत मार्शवर टीका केली आहे. एका नेटिझनने असा प्रश्‍न विचारला आहे की, मिचेल मार्श खरोखरच विश्‍वचषकाच्या लायक आहे का? तर काही जणांनी मार्शला, अरे वर्ल्डकपचा जरा तरी आदर कर, असे सुचवले आहे. सोबत विश्‍वचषक विजेते माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कपिलदेव, सचिन तेंडुलकरचे विश्‍वचषकासह फोटो टाकण्यात आले आहेत. त्याखाली लिहिलेले आहे की, क्रिकेटचे देव वर्ल्डकपचा कसा आदर करतात बघ. सहाव्यांदा विश्‍वचषक जिंकल्यामुळे त्याची कदर नसल्याचे आणि विश्‍वचषकाचा अनादर केल्याचे काहींनी म्हटले गेले. तर अनेक नेटकर्‍यांनी हा विश्‍वचषक स्पर्धेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकर्‍याने फुटबॉल वर्ल्डकप उशाशी घेऊन झोपलेल्या लिओनेल मेस्सीचा फोटो टाकून अशी कमेंट केली आहे की, जे ट्रॉफीच्या खरे लायक असतात त्यांच्यासाठी तिची किंमत अशी असते. दुसरीकडे काहीजणांनी असेही म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियन संस्कृतीत अशा गोष्टींना महत्त्व दिले जात नाही. त्यांचे संस्कार वेगळे असतात. मार्शने कोणताही हेतू मनात ठेवून हे कृत्य केले नसेल, तर काहींनी हा विश्‍वचषक त्यांचा आहे, त्यांनी त्यांना हवे ते करावे, असे मत व्यक्त केले आहे. फायनल मॅच झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्स आणि कमेंटचा पाऊस पडला. बर्‍याच जणांनी भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे. एका मिम्समध्ये लिहिले आहे की, आख्ख पॅनेल आले, पण सरपंच ऑस्ट्रेलियाचा आला. दुसर्‍या एकाने टिपणी केली की, सरकार यापेक्षा मोठा वर्ल्ड कप आणून देणार आहे. आणखी एकाने म्हटले की, 10 देशांत खेळल्या गेलेल्या स्पर्धेला वर्ल्डकप म्हणणे हाच विनोद. तर आणखी एकाने लिहिले, ‘हार गये गम नही, लेकिन जिस तरह से हार गये दिल टूट गया. तर आणखी एकाने शोलेच्या गब्बरचा फोटो टाकून, कितने आदमी थे, असा फोटो टाकला आहे.

अहमदाबादचे प्रेक्षक मौनी
काही नेटकर्‍यांनी अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही टीका केली आहे. या प्रेक्षकांनी टीम इंडियाला पाठिंबा न देता गप्प राहणे पसंत केले, असे म्हटले आहे. चित्रपट निर्माता अतुल कसबेकर म्हणाले, अहमदाबादचे प्रेक्षक वाह्यात होते. स्टेडियममध्ये योग्य प्रेक्षकांची गरज होती. वानखेडेच्या प्रेक्षकांनी कमीत कमी टीमचा हुरूप तरी वाढवला असता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top