ओडिशातील महानदीत बोट उलटली! ७ जणांचा मृत्यू

भुवनेश्वर

ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील महानदीत काल संध्याकाळी एक प्रवासी बोट उलटली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर महिला आणि लहान मुलांसह सुमारे ७० अधिक लोक होते. त्यातील ४८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. एसडीआरएफची टीम बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे.

प्रवासी बोट बारगढ जिल्ह्यातील बनजीपल्लीकडे जात होती. बोट झारसुगुडा येथील शारदा घाटात येताच ती अचानक उलटली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रवासी स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. काहींनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांचा आवाज ऐकून तेथे असलेले मच्छिमार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावपथकाला या घटनेची माहिती दिली. मच्छिमारांनी ३० हून अधिक लोकांना वाचवले. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र या घटनेत ७ लोकांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला. पण रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा ही शोधमोहिम सुरु झाली. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अंजोरी पाली, ब्लॉक खरसिया येथे राहणाऱ्या ७ वर्षीय पिकू राठिया याचा मृतदेह सापडला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top