कंबर मोडेल पण कर्ज फिटणार नाही! त्यासाठी वेगळे ऑपरेशन करावे लागते! देवेंद्र फडणवीसांचे उघड उघड राजकारण

पंढरपूर- माढा लोकसभा निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी सील केलेली गोडाऊन उघड केल्यानंतर त्याच विठ्ठल सहकारी कारखान्यात भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी प्रचार सभा घेऊन दाखवली. इतकेच नव्हे तर हा कारखाना थकीत कर्जाच्या बोज्यामुळे जप्त होऊ नये, यासाठी शरद पवारांची साथ सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलेले अभिजित पाटील यांना उघड उघड राजकारण शिकवित देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत म्हणाले की, हे कर्ज आणि त्यावरील वाढते व्याज फेडणे शक्य नाही. कंबरडे मोडेल, पण कर्ज फिटणार नाही. हे कर्ज फेडण्यासाठी वेगळे ऑपरेशन करावे लागेल. ते कसे करायचे हे मला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आधीचे वक्ते म्हणाले की आई वाचवायची की बाळ वाचवायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. मी तुम्हाला सांगतो की, आई वाचणार आणि बाळही वाचणार आहे. बंद पडलेले कारखाने घ्यायचे आणि ते 35 दिवसांत सुरू करायचे ही किमया अभिजितरावांनी केली. असे चार-पाच कारखाने त्यांनी सुरू केले. हे कारखाने खासगी केले असते तर ते आज देशाचे अदानी-अंबानी झाले असते, पण त्यांनी सहकारी कारखाने काढले. आम्ही त्यांना खिंडीत गाठले नाही. जे घडले तो योगायोग होता.
यापुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अभिजित पाटील यांच्यावर आमचा डोळा होताच. बापू म्हणाले की, आपला भाचा आहे. त्याला मदत करायची आहे. आता या विठ्ठल परिवाराला मी दत्तक जात आहे. हा कारखाना निश्चित वाचवू. पुढील तीन-चार महिन्यांत सरकार आणि बँकेची मदत घेऊन पुनर्वसनाचे पॅकेज देऊ. तुम्हाला आता काळजी नसेल. कारण पुनर्वसनाची जबाबदारी मी घेतली आहे. तुम्ही म्हणता की, कारखाना महत्त्वाचा आहे. राजकारण महत्त्वाचे नाही. पण राजकारण महत्त्वाचे आहे आणि कारखानाही महत्त्वाचा आहे. सर्व योग्य मार्गाने करू.
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपाचे रणजित नाईक-निंबाळकर असा लढा आहे. यात विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा शरद पवारांना पाठिंबा होता. ते प्रचारातही सहभागी होते. मात्र अचानक कर्जाच्या थकबाकीपोटी राज्य सहकारी बँकेने त्यांची तीन गोडाऊन सील केली आणि कोट्यवधीचा ऊस अडकला. यानंतर अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, भाजपाला पाठिंबा जाहीर केला आणि त्याच दिवशी लवादाच्या आदेशाने विठ्ठल कारखान्याच्या गोदामाचे सील काढले गेले. आज त्याच कारखान्याच्या आवारात भाजपाच्या उमेदवारासाठी देवेंद्र फडणवीसांची सभा झाली. 7 मे रोजी माढा मतदारसंघाचे मतदान होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top