कडवईमध्ये काठीच्या आधाराने ५० फुट उंचीच्या झाडाची होते होळी

संगमेश्वर – संपूर्ण कोकणातील शिमग्याचे एक वेगळे वैशिष्ट्य असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील होळी पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून लोक येत असतात.कारण याठिकाणी केवळ एका काठीच्या आधाराने ५० फुट उंचीचा होळीचा माड उभा केला जातो.
ग्रामदेवता श्री वरदानदेवीच्या या शिमगोत्सवात धुलिवंदनाच्या दिवशी गावकरी केवळ काठीच्या आधाराने होळीचा माड उभा करतात.यादिवशी कडवई ग्रामदेवतेच्या मंदिरात मोठी यात्राही भरते.ढोल-ताशांच्या गजरात हा शिमगोत्सव साजरा केला जातो.कडवईत आंब्याचे ४५ ते ५० फूट उंचीचे झाड गावातून ठरलेल्या ठिकाणाहून वाजत गाजत आणले जाते.त्यानंतर ठरलेल्या यात्रेच्या ठिकाणी काठीच्या आधाराने ते उभे केले जाते.ग्रामस्थ आपल्या हातातील काठ्या एक-एक करून होळीच्या माडाला लाऊन होळी उभी केली जाते.यावेळी दुसरा कोणताही आधार घेतला जात नाही.हे करत असताना गावकऱ्यांच्या एकीचे बळ आणि श्रध्दा दिसते.झाड कितीही उंच असले तरीही विनाअडथळा ते केले जाते. काही मिनिटांतच एवढे मोठे झाड उभे राहत असताना हा सोहळा सारेजण याची देही याची डोळा अनुभवतात. त्यानंतर वरदानदेवीची पालखी तिची बहिण शिंदे आंबेरी गावची ग्रामदेवता चंडिकादेवीच्या भेटीला जाते.या दोन्ही पालख्यांमधील नारळांची अदलाबदल होते असे भाविक सांगतात. या भेटीनंतर दोन्ही पालख्या गावभेटीसाठी जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top