कणकवली – कणकवलीतील तालुका प्रवासी संघ गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या पोलिसांचे ४ सप्टेंबरला सकाळी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वागत करणार आहे. या स्वागत सोहळ्यासाठी तालुका प्रवासी संघ तयारी सुरू केलेली आहे.तालुका प्रवासी संघाने वीजपुरवठा आणि एसटी बसेस सुरुळीत राहण्याबाबत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता व एसटीचे विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले. विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गणेशोत्सव काळात खरेदीसाठी खेडेगावातील गणेशभक्त बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. त्यांना गावातून येण्यासाठी एसटी बस हेच किफायतशीर माध्यम आहे. त्यामुळे गावातून ये-जा करणाऱ्या एसटी कोणत्याही स्थितीत रद्द करू नयेत. या गाड्या नियमित वेळेत सोडाव्यात.वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गणेशोत्सवात वीजपुरवठा अखंडित सुरू राहिल्यास लोकांना सणाचा आनंद घेता येईल. त्यासाठी वीजखांब, तारा आदींची वेळेत दुरुस्ती व्हावी, यसाठी कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्या.
