कर्जतमधील गुंडगे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

कर्जत – डम्पिंग ग्राऊडबाबत सकारात्मक उपाययोजना न केल्यामुळे कर्जत नगरपरिषद हद्दीतील हजारो लोक संतप्त झाले असून त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली असून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून गुंडगे गावालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. अनेकांना श्वसनाचे विकार होत आहेत.तर शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. या घाणीमुळे परिसराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी होत आहे. तरीही कर्जत नगरपरिषद याची दखल घेत नाही. डम्पिंग ग्राउंड पर्यायी जागेवर हलवावे, या मागणीसाठी संघर्ष समितीने कर्जत नगरपरिषद कार्यालयावर गेल्यावर्षी १२ जानेवारी रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढला होता. शिवाय कर्जत-खालापूर विधानसभेच्या आमदारांना यंदा २६ जानेवारी रोजी पत्र दिले होते.यंदा १८ मार्चलाही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. तरीही या ग्रामस्थांच्या समस्येकडे कुणीच लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गुंडगे गाव तसेच परिसरातील लोकांनी मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत गुंडगे तसेच परिसरातील ग्रामस्थ सहभागी होणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top