कर्जत तालुक्यात सापडले प्राचीन मंकाळा खेळाचे पट

कर्जत – तालुक्यातील दहिवली गावाच्या वेशीवर असलेल्या प्रसिद्ध जाखमाता परिसरात प्राचीन खेळ मंकाळाचे तब्बल अठरा कोरीव पट सापडले आहेत. इतिहास अभ्यासक आणि संशोधक सागर मधुकर सुर्वे आणि नेत्रा गणेश कनोजे हे विद्यापीठाच्या प्रकल्प संशोधनासाठी त्याठिकाणी गेले असताना त्यांनी हे प्राचीन खेळाचे पट शोधून काढले.

सागर सुर्वे आणि नेत्रा कनोजे हे दोघे इथल्या टेकडीवर संशोधन करत असताना त्यांना कातळात खोदलेल्या पायऱ्या (पावठ्या) आढळल्या. त्यावरून ते गेले असता पुढे असलेल्या कातळावर मंकाळा खेळाचे तब्बल अठरा पट कोरलेले दिसून आले.तात्काळ त्यांनी त्याचे पांढऱ्या रंगाने मार्क करून मितेश डागा यांच्याकडून ड्रोन शूट करून घेतले. जेणेकरून त्यावरून त्यांना त्या परिसराचे अधिक संशोधन करता येईल. या मोहिमेत गौरकामथ गावाचे उपसरपंच व इतिहासप्रेमी योगेश देशमुख यांचीही मदत झाली. सातवाहन काळात हा मार्ग कल्याणच्या बंदरातून कोंडाणे लेणीकडे जात होता. दोन हजार वर्षांपूर्वी इथून सार्थवाह,बौद्ध भिक्षु व व्यापारी तांडे कोंडाणे लेणीमार्गे देशावर जात असत, त्याच मार्गावर असलेल्या या प्रचंड मोठ्या कातळावर मंकाळा खेळाचे पट कोरण्यात आले आहेत. आता हे संशोधन दस्तावेज इतिहास परिषदेत मांडणार असल्याचे सुर्वे व कनोजे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top