कवठेमहांकाळ- तालुक्यातील एकमेव नदी असलेली हिंगणगाव येथील ‘अग्रणी’ आता एप्रिल महिन्यातील ऐन उन्हाळ्यात वाहताना दिसत आहे. म्हैशाळ योजनेचे पाणी या नदीत सोडल्याने ही सुखद परिस्थिती शेतकर्यांना अनुभवायला मिळत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्याला वरदायी ठरलेली महत्त्वाकांक्षी म्हैशाळ योजना पूर्ण झाली आहे. याच म्हैशाळ योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडले आहे. त्यामुळे मळणगावपासून लोणारवाडीपर्यंत अग्रणी वाहत असल्याचे चित्र एप्रिल महिन्यातच दिसत आहे. एरवी अग्रणी नदी ही केवळ पावसाळ्यातच तुडुंब भरलेली दिसत होती. उन्हाळ्यात ही नदी कायम कोरडी असायची. परंतु यंदा प्रथमच उन्हाळ्यात ही नदी वाहत आहे. या नदीवरील एकूण १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सध्या तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकर्यांना उन्हाळयातच मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








