कसाबची बिर्याणी आणि निकमांची कबुली

मुंबई – मुंबईवर भयंकर शक्‍तिशाली हल्ला करणारा अतिरेकी अजमल कसाब याला शिक्षा झाली. त्याची चौकशीची प्रक्रिया तत्कालीन पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केली होती. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या आत्मकथेत याचा उल्लेख आहे. याच पुस्तकात त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे की, अतिरेकी अजमल कसाबला जेलमध्ये कधीही बिर्याणी देण्यात आली नाही, त्यांच्या या वक्तव्याने एक मोठा वाद शांत झाला.
या प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (सध्याचे शिंदे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आहेत) यांनी म्हटले होते की, अजमल कसाबला जेलमध्ये बिर्याणी खाऊ घालण्यात आली, त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजली. केंद्रातील काँग्रेसच्या मनमोहन सरकारपर्यंत याची झळ पोहोचली आणि विरोधकांना टिकेसाठी मजबूत अस्त्र मिळाले. उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्यानंतर ऑर्थर कारागृहातील जेवण बनविणारे ज्योतिराम सुतार, कृष्णा तुळसकर आणि जगदीश शेट्टी यांच्यासह सहा पोलिसांची बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर तीन वर्षांनी 2015 मध्ये उज्ज्वल निकम यांनी म्हणे कबूल केले की, कसाबला कधीही बिर्याणी खाऊ घातली नव्हती, अशी पोस्ट फिरत आहे. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात बिर्याणी दिली नाही असे म्हटले आहे. मात्र कसाबने बिर्याणी खाल्ली आणि कसाबने बिर्याणी खाल्ली नाही याच्यामध्ये खूप काळ गेला आणि तो काँग्रेस सरकारला घातक ठरला. उज्ज्वल निकम यांना आता उमेदवारी मिळाल्यावर हा संपूर्ण किस्सा आणि मिरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील कसे परिच्छेद सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात खरे-खोटे काय हे सांगता येत नाही, पण उज्ज्वल निकम याला प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top