काँग्रेसवर कुठलीही टीका न करता मिलिंद देवरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्यामुळे अस्वस्थ झालेले माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आज दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. त्यासोबत १० माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकारी होते. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी अतिशय कठीण होता, असे मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेशादरम्यान सांगताना काँग्रेस पक्षावर कोणतीही प्रकारची टीका केली नाही.
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. त्यात आज सकाळी मिलिंद देवरांनी एक्सवर पोस्ट केली की,‘आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाची अध्यायाचा समारोप होत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे,` त्यानंतर त्यांनी सपत्नीक सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याआधी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मी विकासाच्या मार्गावर जात आहे.`
दुपारी तीन वाजता १० माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यासोबत घेऊन मिलिंद देवरा वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत जाहीर प्रवेश दिला. त्यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकरांसह अन्य नेते उपस्थित होते. या पक्ष सोहळ्यात मिलिंद देवरा म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी भावूक आहे. मी काँग्रेस सोडेल असे वाटले नाही. मी काँग्रेससोबतचे ५५ वर्षाचे जुने नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक आणि विकासाचे राहिले आहे. माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत मेहनती आहेत. ते सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असतात आणि शिंदे जमिनीवरचे नेते आहेत. सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना माहीत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांच्याकडे व्हिजन मोठे आहे. त्यामुळे मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडेही देशाचे व्हिजन आहे. त्यामुळे मला शिवसेनेचे हात मजबूत करायचे आहेत. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी मला शिंदे यांनी पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले. शिंदेंना मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. मी खासदार बनून चांगले काम करू शकतो, असे एकनाथ शिंदे यांचे मत आहे. त्यांनी विश्वास टाकला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
मिलिंद देवरांनी घेतलेला निर्णय
अत्यंत दुर्दैवी – वर्षा गायकवाड

मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर वर्षा गायकवाड पोस्ट करत म्हणाल्या की, ‘मिलिंद देवराजी, तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला खूप दुःख होते आहे. आम्ही अनेक दिवस तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पक्षश्रेष्ठींनीही तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. भारत जोडो न्याय यात्रा ज्यादिवशी सुरू होते आहे, त्याच दिवशी हा निर्णय घेतला हे ही दुर्दैवी आहे.
न्याय यात्रेवरून लक्ष
वळवण्याचा प्रयत्न-नाना पटोले

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,‘आजपासून सुरू झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी आणि केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत. दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.`
जयराम रमेश यांना आली
मुरली देवरा यांची आठवण

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरा यांचे नाव न घेता त्यांचे वडील मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘मुरली देवरा यांच्यासोबतचे ते दिवस मला आठवत आहेत. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जीवलग मित्र होते, पण ते काँग्रेसशी एकनिष्ठ होते. ते प्रत्येक कठीण काळात, अडचणींच्या वेळी काँग्रेस पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले.`
दक्षिण मुंबईची जागा
आमचीच- राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, कुणी निवडणुकांसाठी किंवा पदासाठी पक्ष बदलणार असतील, तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झाली आहे. त्या परंपरेनुसार ते (मिलिंद देवरा) पक्ष बदलणार असतील, तर त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी यावर का बोलू? माझा आणि माझ्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे, अरविंद सावंत दोनदा निवडून आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top