कात्रजच्या प्राणी संग्रहालयात लवकरच झेब्रा येणार

पुणे

पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वेगवेगळे व दुर्मिळ प्राणी पाहायला मिळावेत, यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आता या संग्रहालयात झेब्रा येणार असून त्यासाठी युरोप, इस्राईल, आफ्रिकेत शोध सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने १ कोटी ६ लाख रुपयांची निविदा काढली आहे. कात्रजमध्ये १३० एकर जमिनीवर हे प्राणी संग्रहालय आहे. यामध्ये साप, साळिंदर, बोनेट माकड, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, चिंकारा, कोल्हा, वाघ, हत्ती, लांडगा, बिबट्या यांसह ६० प्रजातींच्या ४५० प्राण्यांचा समावेश आहे.

या ठिकाणी ७ वाघ आहेत. त्यातील छत्रपती संभाजीनगरमधून आणलेला अर्जुन हा वाघ आणि भक्ती ही राजकोट येथून आणलेली पांढरी पट्टेरी वाघीण नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. यात आता वाढ करून झेब्रा, चौशिंग्या, तरस या प्राण्यांचा समावेश करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. झेब्रा हा अश्‍व वर्गातील प्राणी भारतामध्ये आढळत नाही. युरोप, आफ्रिका खंडासह इस्राईलमध्ये तो आढळतो. लहान मुलांसह मोठ्यांमध्येही झेब्राचे आकर्षण आहे. त्यामुळे त्याचा प्राणिसंग्रहालयात समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी ५,००० चौरस मीटरचे खंदक तयार करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top