Home / News / कारगिल युद्धात आमचे सैनिक! पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

कारगिल युद्धात आमचे सैनिक! पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

कराची- पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याच्या सहभागाची जाहीर कबुली दिली....

By: E-Paper Navakal

कराची- पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याच्या सहभागाची जाहीर कबुली दिली. तब्बल २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान सैन्याने हे कबूल केले. लष्करप्रमुख मुनीर यांनी संरक्षण दिवसानिमित्त केलेल्या भाषणात भारताविरुद्ध झालेल्या तीन युद्धासह कारगिलचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या ‘शहीद’ सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

लष्करप्रमुख मुनीर यांनी पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयात शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले की, पाकिस्तान निश्चितच एक शक्तिशाली आणि शूर देश आहे. त्याला स्वातंत्र्याच्या मुल्याची जाणीव आहे. हे स्वातंत्र्य कसे राखायचे याची माहिती आहे.१९४८,१९६५, १९७१ आणि कारगिल किंवा सियाचिन युद्धामध्ये आपल्या हजारो जवानांनी देशासाठी बलिदान दिले. ते देशासाठी शहीद झाले.

गेली २५ वर्षे पाकिस्तानने कारगिल युद्धात आपला सहभाग नसल्याचे म्हटले होते. हे युद्ध काश्मीरमधील काश्मिरी अतिरेकी मुजाहिदीनने घडवून आणल्याचे पाकिस्तान आजवर म्हणत आला आहे. त्यांनी आपल्या सैन्याचा सहभाग असल्याचे कधीही मान्य केले नव्हते. माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनीही कारगील युद्ध हे स्थानिकांनी केलेली यशस्वी कारवाई होती असा नेहमी दावा केला होता. कारगिल युद्धात मारले गेलेल्या सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानने ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे त्या सैनिकांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तान सरकार आणि सैन्यावर नाराजीदेखील व्यक्त केली होती.

Web Title:
संबंधित बातम्या