काश्मिरमध्ये ५० टार्गेट किलिंग, ६० हल्ले करणारा दहशतवादी ठार!

श्रीनगर

काश्मिर खोऱ्यात मुस्लिम, काश्मिरी पंडितांच्या हत्यांमागचा मास्टरमाइंड दहशतवादी बासित अहमद दार (३०) काल चकमकीत ठार झाला. लष्कराची दक्षिण काश्मिरच्या कुलगाम येथे १२ तास चकमक सुरु होती. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी बासितला कंठस्नान घातले. तो द रेसिस्टंट फ्रंट (टीआरएफ) नावाच्या संघटनेचा सदस्य होता. तो काश्मीरचा मोस्ट वाँटेड दहशतवादी होता. काश्मिरमध्ये २०२१ पासून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त झालेल्या टार्गेट किलींगपैकी बहुतांश बासितने घडवून आणल्या होते.

बासितने २०२४ मध्ये दक्षिण काश्मीरात आतापर्यंत दोन टार्गेट किलिंग केली. ८० दहशतवादी हल्ल्यांत त्याचा सहभाग होता. या कारणास्तव राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बासित हा कुलगामच्या रेडवानी भागात लपल्याची माहिती सोमवारी रात्री लष्कराला मिळाली होती. रात्रभर सैनिकांनी त्याच्यावर नजर ठेवली. काल सकाळी ऑपरेशन सुरू झाले. यामध्ये बासितसह दोन दहशतवादी मारले गेले. बासित हा एप्रिल २०२१ मध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य बनला आणि नंतर तो ‘लष्कर’ची सहयोगी संघटना टीआरएफचा सदस्य झाला. २०२१ मध्ये टीआरएफचा प्रमुख शेख अब्बास याच्या हत्येनंतर बासितने स्वतःला नेता घोषित केले होते. तीन वर्षांमध्ये त्याचा प्रथमच लष्करासोबत थेट आमना-सामना झाला होता. “बासित हा अ ++ श्रेणीचा दहशतवादी होता,” अशी माहिती काश्मीर पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्डी यांनी दिली. दरम्यान, कुलगाममध्ये मारला गेलेला दुसरा दहशतवाद्याचे नाव मोमीन गुलजार असे आहे. तो श्रीनगर डाऊनटाऊनचा रहिवासी होता. गेल्यावर्षी श्रीनगरमध्ये क्रिकेट खेळताना मोमीनने एका पोलिसाची हत्या केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top