काश्मीरच्या पुलवामात बोट उलटली ७ जणांना वाचविले, २ जण बेपत्ता

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथे काल सायंकाळी उशिरा झेलम नदीत एक बोट बुडाली. बोटीतून नऊ जण प्रवास करीत होते, त्यापैकी ७ जणांना वाचवण्यात आले. मात्र, दोन जण बेपत्ता आहेत. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांना शोधण्यासाठी काल रात्रीपासून शोधमोहीम सुरू आहे.
राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), पोलीस आणि निमलष्करी दल बचाव कार्यात गुंतले आहेत. पुलवामाचे उपायुक्त डॉ. बशारत कय्युम यांनी सांगितले की, नदीचा प्रवाह जोरदार असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. मात्र, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सर्व पथके प्रयत्न करत आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये नदीच्या जोरदार प्रवाहात बोट बुडताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व लोक हातीवाडा येथील शेतात मजूर म्हणून काम करीत होते. सायंकाळी काम आटोपून ते परतत असताना हा अपघात झाला. काकापोरा पुलाऐवजी बोटीने नदी पार करण्याचा शॉर्टकट मार्ग त्यांनी निवडला होता.
महिनाभरात झेलम नदीत बोट अपघाताची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी श्रीनगरमधील झेलममध्ये एक बोट उलटली होती. बोटीत १५ जण होते. त्यापैकी ७ शाळकरी विद्यार्थी आणि ८ स्थानिक रहिवासी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top