कुंडई ते मडकईत बिबट्याचा संचार

फोंडा – उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील कुंडई ते मडकई येथील बगल रस्त्याच्या बाजूला झाडे झुडपे असल्याने काही दिवसांपासून एका बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. बिबट्याचा या परिसरात वावर वाढल्यामुळे लोकांची मात्र तारांबळ उडाली आहे. बिबट्याची धास्ती वाढत असून रात्री-अपरात्री ये जा करणाऱ्यांना वाहनचालकांना तर जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागत आहेत.
सीमेपाईण म्हार्दोळ येथे वरच्या बाजूने असलेल्या बगल रस्त्यावर दोन-तीन दिवसांपूर्वी एक बिबट्या दुचाकीच्या मागे धावून गेल्याने चालकाने जीव मुठीत घेऊन स्वतःचा बचाव केला. सीमेपाईण भागातील अनेक लोकांचे पाळीव कुत्रे गेल्या काही दिवसात गायब झाले आहेत. त्यामुळे बिबट्या कुत्र्याच्या शोधात परिसरात फिरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी मावळणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती वाहने घेऊन येथे येत असतात.तसेच कुंडई औद्योगिक वसाहत व मडकई औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे काही कामगारसुद्धा याच रस्त्याने ये-जा करत असतात.मात्र,आता बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांची वर्दळ कमी होत चालली आहे. वन खात्याने या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी लोकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top