केंद्राने पंजाब, प. बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारली

नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या पंजाब आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथला केंद्र सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे दिल्लीत राजकारण तापले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पंजाबमधील आम आदमी पक्ष आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला धक्का बसला आहे. केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक विरोधकांना डावलत असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे. दरम्यान, यंदा महाराष्ट्राने प्रजासत्ताक दिनी विजयपथावर होणाऱ्या संचलनात ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करण्याची परवानगी मागितली आहे.

यंदाच्या चित्ररथामध्ये पंजाब आणि पश्चिम बंगालला परवानगी नाकारताना केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की, प्रजासत्ताक दिनी चित्ररथाचे सादकीकरण करण्यासाठी जी नियमावली जारी केली होती, त्या नियमांच्या अधीन राहून परवानगी नाकारण्यात आली. या दोन्ही राज्यांचे चित्ररथ हे यावर्षी निश्चित करण्यात आलेल्या विषयाला अनुसरुन नव्हते. त्यामुळे या राज्याच्या रथाच्या सादरीकरणाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

केंद्राने पुढे सांगितले की, देशभरातून ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून चित्ररथाच्या सादरीकरणाचे प्रस्ताव येतात. त्यातील निवडक १६ ते १७ राज्यांच्या रथांचीच सादरीकरणासाठी निवड केली जाते. पंजाबच्या चित्ररथा संदर्भात निवड समितीने तीन फेऱ्या घेतल्या. त्यामध्ये पंजाबच्या चित्ररथाचा समावेश होता. मात्र, अंतिम फेरीत पंजाबच्या चित्ररथाचा समावेश केला नाही. पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा केवळ पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच विचार करण्यात आला. मात्र, त्यांच्या चित्ररथाचे सादरीकरण विषयाला अनुरुप नसल्याने त्यांना तिसऱ्या फेरीपूर्वीच बाहेर काढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top