Home / News / केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नीचे डेंग्यूमुळे निधन

केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नीचे डेंग्यूमुळे निधन

भुवनेश्वर- केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नी झिंगिया ओरम यांचे डेंग्यूमुळे निधन झाले आहे. त्या ५८ वर्षांच्या होत्या. ओडिशामध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम यांनाही डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी झिंगिया ओरम यांच्या निधनावर दुखः व्यक्त केले आहे. ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. जुआल यांच्या दीर्घ राजकीय प्रवासात झिंगिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घटनेमुळे जुआल यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या सुंदरगढमधील लोकांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्र्यांसह कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन, आरोग्यमंत्री मुकेश महालिंग, विधानसभा अध्यक्ष सुरमा पाधी आणि अन्य भाजप नेत्यांनी दिवंगत झिंगिया ओरम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.