Home / News / केदारनाथच्या पायवाटेवर भूस्खलनाने यात्रा थांबली

केदारनाथच्या पायवाटेवर भूस्खलनाने यात्रा थांबली

केदारनाथ – चार धाम यात्रेतील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे केदारनाथ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ही यात्रा थांबली असून पोलीस प्रशासनाने यात्रेकरुंना जिथे असाल तिथे थांबवण्याचे आवाहन केले आहे.केदारनाथ यात्रेचे दूसरे सत्र सध्या सुरु आहे. पावसाळा जवळजवळ संपला असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. या पावसामुळे केदारनाथ धामला जाण्याचा पायी मार्ग जागोजागी खचला आहे. या मार्गावर २ हजारहून अधिक यात्रेकरु अडकले असून पोलिसांनी त्यांना आहे त्या ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काल रात्री गौरीकुंडवरुन केदारनाथ धामकडे जाणारा रस्ता जंगल चट्टीजवळ भूस्खलनामुळे १० ते १५ मीटर खचला. त्यानंतर पोलीस, एनडीआरएफ व इतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यात्रेकरुंना पर्यायी मार्ग तयार करुन देण्यात येणार असून तोपर्यंत त्यांना आहे त्या ठिकाणी थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे सोनप्रयाग व गौरीकुंड येथे भाविकांना थांबवण्यात आले. केदारनाथ हून परतणाऱ्या भाविकांनाही थांबवण्यात आले आहे. गौरीकुंड येथे राहण्याची व्यवस्था मर्यादित असल्याने भाविकांनी आहे तिथेच थांबावे असे आवाहनही करण्यात आले आहे. लोकांनी गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, श्रीनगर या ठिकाणी थांबावे किंवा इतर धामाच्या यात्रा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.