कोयना धरण जलाशयात वाऱ्यामुळे स्पीट बोट उलटली

सातारा : कोयना धरणाच्या जलाशयात वादळी वाऱ्यामुळे स्पीट बोट बुडाल्याची घटना काल सायंकाळी घडली. पुलाच्या कामाची पाहणी करून स्पीड बोटीतून परत येत असताना वादळी वाऱ्यामुळे कोयना जलाशयात बोट बुडाली. या घटनेत एक जण बुडाला, तर दोघेजण पोहत बाहेर आल्याने बचावले.
कोयना धरणाच्या जलाशयात तापोळा ते आहिर दरम्यान केबल स्टेड पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजूर केले आहे. याच पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी स्पीड बोटीने तापोळ्याला गेले होते. कामाची पाहणी करून परत येत असताना तेटली (ता. जावली) हद्दीत वादळी वाऱ्यामुळे त्यांची स्पीड बोट जलाशयात उलटली. या दुर्घटनेत गजेंद्र बबन राजपुरे (४२) हे जलाशयात बुडाले, तर सतीश थोरवे (५२), बालेश्वर महातो (४२) हे पोहत बाहेर आल्याने बचावले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जलाशयात बुडालेली व्यक्ती बेपत्ता आहे. तिचा ठावठिकाणाला लागलेला नाही. स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र, प्रचंड पाऊस आणि अंधारामुळे शोध कार्यात अडथळे येत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top