कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांच्या घरावर सीबीआयचे छापे

कोलकाता- पश्चिम बंगालचे मंत्री आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांच्या घरावर सीबीआयची छापेमारी करण्यात आली. महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने आज सकाळी कोलकाता महापौर आणि बांधकाम आणि नगरविकास मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला. छापेमारीच्या वेळी घराबाहेर केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, महापालिकांमधील भरती प्रकरणाचा समांतर तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी गुरुवारी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आज अचानक पालिकांमधील कोट्यवधींच्या नोकरभरती प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने महापौर फिरहाद हकीम यांच्या निवासस्थानी झडती घेतली. याच तपासासंदर्भात सीबीआय अधिकाऱ्यांचे आणखी एक पथक तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. इथे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, कोणालाही घरात प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नाही. केंद्रीय दलाच्या मंत्र्यांच्या जवानांनी अंगरक्षक आणि वकिलांनाही निवासस्थानात प्रवेश दिला नाही. मंत्र्यांची मुलगी प्रियदर्शनी हकीम हिलाही सुरुवातीला घरात जाण्यापासून रोखण्यात आले, पण नंतर त्यांना परवानगी देण्यात आली. हकीम आणि तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक समर्थकांकडून छापा आणि शोध मोहिमेला विरोध करण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top