गडचिरोलीत वाघाच्या कातड्याची तस्करी करणार्या दोघांना अटक

गडचिरोली- वाघाच्या कातडीची तस्करी करताना गडचिरोलीच्या एटापल्ली येथे दोघांना वन विभागाने अटक केली.काल बुधवारी पहाटे ३ वाजता एटापल्ली-जीवनगट्टा मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. शामराव रेमश नरोटे (रा. वासामुंडी) आणि अमजद खान पठाण (रा. एटापल्ली) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.त्यांच्याकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-छत्तीसगड वनविभागाला एटापल्ली तालुक्यात वाघाच्या कातड्याची तस्करी संदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल बुधवारी पहाटे ३ वाजता दोन्ही राज्याच्या वनविभागाने एटापल्ली-जीवनगाट्टा मार्गावर सापळा रचला होता.या दरम्यान एका दुचाकीवरून दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांची कसून तपासणी केली असता प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व वनकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महिनाभरापूर्वी एटापल्ली तालुक्यातील मवेली परिसरात वाघाने बैलाची शिकार केली होती.त्यामुळे खळबळ माजली होती. मात्र,त्यांनतर त्याभागात वाघाची कुठलीही हालचाल दिसलेली नव्हती.त्यामुळे या वाघाची शिकार झाल्याचा संशय वन अधिकाऱ्यांना होता.त्यामुळे वन विभागाने त्या दृष्टीने तपास सुरू केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top