गणेशोत्सवात यंदा ४ दिवस मध्यरात्री १२पर्यंत लाऊड स्पीकर्सना परवानगी

मुंबई

यंदा गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवात तीनच दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. त्यांची नाराजी आणि सणाचा उत्साह पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा गणेशोत्सवात ४ दिवस ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

गणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवसासांठी परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे गणोशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी १३ दिवसांची यादी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील चार दिवस, नवरात्रातील दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस, ख्रिसमसचा आधीचा दिवस २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर यांचा समावेश आहे. ईद ए मिलादसाठी एक दिवस देण्यात आला आहे. मात्र चंद्र दर्शनानुसार हा दिवस ठरवण्यात येणार आहे. आणखी दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक किंवा ध्वनीवर्धकाचा वापर करता येतो. सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करता येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top