गुजरातच्या पोरबंदरमध्ये ३३०० किलोचे अंमली पदार्थ जप्त! ५ जणांना अटक

गांधीनगर- गुजरातमधील पोरंबदर येथे एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करत ३३०० किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. अरबी समुद्रात भारतीय सीमेवर ही कारवाई करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ विदेशी व्यापाऱ्यांनाही अटक केली. हे व्यापारी पाकिस्तानी आणि इराणी असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. तसेच या अंमली पदार्थांची किंमत सुमारे २ हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये ३,०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून गुजरात येथील समुद्राच्या सीमेवर एक अज्ञात बोट उभी होती. पोरबंदरजवळील समुद्रात पाळत ठेवणाऱ्या विमानाला ही बोट दिसली. या जहाजाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ही बोट भारताच्या हद्दीत घुसल्यावर तिला थांबवून तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेली बोट आणि व्यापारी आणि अंमली पदार्थांचा साठा भारतीय बंदरात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या संबंधित एजन्सीकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, ५ दिवसांपूर्वी वेरावळ बंदरातून एका मासेमारी बोटीतून ३५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. यावेळी ९ जणांना अटक करण्यात आली होती. एटीएस, गीर सोमनाथ एसओजी, एलसीबी, एफएसएल आणि सागरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top