अहमदाबाद – गुजरात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फोरमने १ ते ७ एप्रिल दरम्यान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये दिली जाणारी कार्डिओलॉजी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे दर महागाईशी सुसंगत नसल्याचा दावा करून डॉक्टर हृदयरोग उपचारांसाठी चांगल्या दरांची मागणी त्यांनी केली आहे.
फोरमने म्हटले आहे की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट आरोग्यसेवा सुलभ करणे हे आहे. परंतु या योजनेसाठी आर्थिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून ठरवलेले दर ही समस्या आहे. गेल्या काही वर्षांत उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणवर वाढला आहे. परंतु पॅकेजचे दर त्याप्रमाणे वाढलेले नाहीत. २०१५ मध्ये योजनेअंतर्गत पर्क्युटेनियस कोरोनरी इंटरव्हेन्शन (पीसीआय) चा दर ४५,००० रुपये होता. सध्याप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत तो ५०,८०० रुपये आहे. यानुसार वार्षिक वाढीचा दर केवळ १.२२ टक्के आहे. उपकरणे, कर्मचारी आणि उपचारांसाठीच्या इतर खर्चात लक्षणीय वाढ होऊनही, पॅकेजचे दर तेवढेच राहिले आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्डिओलॉजी सेवा प्रदान करणे कठीण होत आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








