गुजरातमध्ये जवानांच्या बसला भीषण अपघात

३८ जवान जखमी

गांधीनगर

गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील हालोल येथे काल संध्याकाळच्या सुमारास राज्य राखीव पोलीस (एसआरपी) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. ह्या अपघातात ३८ जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी ९ जवानांची प्रकृती गंभीर आहे. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उतारावरून खाली जाऊन उलटली. बसमध्ये सुमारे ५० जवान होते. पावागडच्या पायथ्याशी डोंगराळ भागात तीन दिवस गोळीबाराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवान दाहोदला परतत होते. कच्च्या रस्त्यावरून बस खाली उतरताना ब्रेक निकामी झाले. ‘अपघाताच्या वेळी बसमध्ये ५० जवान होते. त्यापैकी ३८ जवान जखमी झाले अ्सून त्यांना हलोल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २९ जवानांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या नऊ जणांना पुढील उपचारासाठी वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात दाखल केले आहे’, अशी माहिती पोलीस निरीक्षक आर. ए. जडेजा यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top