गोव्यात श्री भूमिका मंदिराला टाळे ठोकल्याने मोठा वादंग

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात असलेल्या आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराला टाळे ठोकल्याची घटना घडल्याने मोठा वादंग निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना घटनास्थळी जाऊन हा वाद मिटवावा लागला.

या गावात पाच मानकरी आणि महाजन मंडळी असे दोन गट आहेत. महाजन यांच्या बाजूने एक पुरोहित देवकार्य करतो.तर मानकरी स्वतः देवकार्य करतात. मात्र एका गटातील कुणीतरी मंदिराच्या गर्भकुडीला टाळे ठोकल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून हा वाद शमविण्याचा प्रयत्न केला. सध्या नवरात्र उत्सव असल्याने मंदिरातील देवकार्य तिसर्‍याच पुरोहितामार्फत करण्याच्या सूचना पेडणे उपजिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच दोन्ही गटांनी यात हस्तक्षेप करून अडथळे आणू नये अशा सूचनाही त्यांनी गावकऱ्यांना दिल्या.