घाबरू जाऊ नका, सतर्क रहा कोरोनाबाबत केंद्राचा सबुरीचा सल्ला

नवी दिल्ली
कोरोनाचे वाढते रुग्ण आणि श्वसनाच्या आजाराने ग्रस्त लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राज्यांशी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. त्यावेळी मनसुख मांडवियांनी राज्यांना सबुरीचा सल्ला देत सांगितले की, कोरोनाबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
या बैठकीत आयसीएमआरचे संचालक डॉ. राजीव बहल, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि माजी महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन उपस्थित राहिले होते. देशातील सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य मंत्री आणि अधिकारी ऑनलाईनद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी आरोग्य सुविधा आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या चर्चादरम्यान, मनसुख मांडविया यांनी सांगितले की, केंद्र सरकार राज्यांना कोणताही मदत करण्यास तयार आहे. आरोग्याबाबतच्या संकटांना तोंड देण्यासाठी देशातील सर्व रुग्णालये सज्ज असली पाहिजे. रुग्णालयांमध्ये दर 3 महिन्यांनी एकदा मॉक ड्रील झाली पाहिजे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु घाबरु जाऊ नये.
दरम्यान, आज सकाळी देशभरात 341 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 292 रुग्ण केरळमधील आहेत. यासह केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 2041 वर पोहोचली असून कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात कोरोनाचे 2311 सक्रिय रुग्ण आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top