घोटाळ्यात अडकलेले 3 उमेदवार मुंबईतून निवडणुकीच्या मैदानात

मुंबई- मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईत मतदारसंघासाठीच्या महायुतीच्या उमेदवारांची आज अखेर घोषणा झाली. ईडी चौकशीच्या धास्तीने शिवसेना उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे तर दक्षिण मुंबई मतदारसंघात भायखळ्याच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.
या तिन्ही उमेदवारांच्या मागे कोट्यवधी रुपयांच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणांत सध्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे ईडी व इतर संस्थांच्या कचाट्यात सापडलेल्या या उमेदवारांना मतदान कसे करायचे, असा प्रश्न मतदारांना पडणार आहे. रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी पूर्व येथील जोगेश्वरी विक्रोळी लिंक
रोड लगतच्या वेरावली गावात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भुखंडावर बेकायदेशीरपणे 500 कोटी रुपये खर्चून पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा आरोप आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते कीरीट सोमय्या यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत ईडीने वायकर आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या विरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईडीने वायकर यांच्या जोगेश्वरीतील निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित अन्य काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यांच्या निवासस्थानावर टाकलेल्या धाडीमध्ये ईडीला काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. त्या कागदपत्रांची छाननी करून ईडीने वायकर यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. दोन समन्सपैकी एका समन्सवेळी वायकर ईडीच्या कार्यालयात हजर राहिले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सहा-सात तास चौकशी केली होती. ईडी चौकशीच्या या ससेमिऱ्यासमोर वायकर यांचे अवसान गळून पडले. त्यांनी ईडीचा ससेमिरा टाळण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला. वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटातून उमेदवारी दिली जाईल अशी गेले काही दिवस चर्चा होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले.
रवींद्र वायकर यांची मुंबईतील काही धनदांडग्या उमेदवारांमध्ये गणना होते. 2007 साली जेव्हा वायकर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांची संपत्ती 1 कोटी रुपये होती. 2009 साली त्यांची संपत्ती 3 कोटी रुपये झाली. पुढे 2019 पर्यंत त्यांच्या संपत्तीत चौदा पटीने वाढ होत संपत्ती तब्बल 44 कोटी रुपये झाली. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीत आणखी किती पटीने वाढ झाली हे स्पष्ट होईल.
त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाने या मतदारसंघात उमेदवारी दिलेले अमोल कीर्तिकर हे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत. गजानन कीर्तिकर हे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाच्या वळचणीला आले आहेत. आता ते मुलाच्या विरोधात वायकर यांचा प्रचार करणार आहेत ज्याला ते पक्षनिष्ठा म्हणतात. अमोल कीर्तिकर हे त्यांच्या बरोबर न जाता उबाठा गटात राहिले आहेत. करोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी तेही ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. साडेसहा कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात काही दिवसांपूर्वीच त्यांची ईडीने आठ तास चौकशी केली आहे. 27 मार्चला त्यांची उमेदवारी घोषित केल्या केल्या लगेच 28 मार्चला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते . या घोटाळ्यात आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचे अनेक निकटवर्तीय आणि महापालिका अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. खिचडी घोटाळ्यात अडकले असल्याने काँग्रेसमधील संजय निरुपम यांच्यासारख्या काही नेत्यांनी अमोल यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
दक्षिण मुंबईतून उबाठा गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात उमेदावारी मिळालेल्या यामिनी जाधव या माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले यशवंत जाधव यांच्यावर महापालिका कंत्राट घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागाने गेल्या वर्षी धाडी टाकल्या होत्या. त्यांची सलग चार दिवस चौकशी केली होती. त्यांच्या घरी लाल डायरी सापडली होती ज्यात कुणाला किती रक्कम दिली त्याची नोंद होती . इतकेच नव्हे तर 50 लाखाचे महागडे घड्याळ मातोश्रीला दिले अशीही नोंद होती . त्याबाबत त्यांना विचारले असता ते घड्याळ मी माझ्या मातोश्रीला दिले असे त्यांनी उत्तर दिले होते . यामिनी जाधव यांचीही चौकशी झाली होती. किरिट सोमय्या यांनी वायकर दाम्पत्याविरोधात ईडीकडेही तक्रार केली होती. त्यानंतर जाधव दाम्पत्य शिंदे गटात गेले आणि त्यांची चौकशी थांबली होती. आज उमेदवारीही मिळाली .
मुंबईत धनुष्यबाण वि. मशाल
दक्षिण – अरविंद सावंत वि. यामिनी जाधव
दक्षिण मध्य- अनिल देसाई वि. राहुल शेवाळे
उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top