चंद्रयान-३ चंद्राला सोडून पृथ्वीच्या कक्षेत परतले

बंगळुरू :

चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली. चंद्रावरील विक्रम लँडर एका पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर नेण्याच्या प्रयोगानंतर इस्रोचे हे आणखी एक यश आहे.

इस्रोने सांगितले की, चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणले गेले. हे अंतराळयान १४ जुलै २०२३ रोजी एसडीएससी, एसएचएआर वरून एलव्हीएम३-एम४ वाहनावर सोडण्यात आले होते. २३ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरला. एजन्सीचे मुख्य लक्ष्य लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करणे आणि चंद्राच्या अंतिम कक्षेत ठेवणे हे होते. विभक्त झाल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूलचे स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) पेलोड सक्रिय केले गेले. योजनेनुसार, आधी हा पेलोड प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये ३ महिन्यांसाठी सक्रिय ठेवण्याचे प्रयोजन होते. सध्या प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीभोवती फिरत आहे. २२ नोव्हेंबर रोजी त्याने १.५४ लाख किमी अंतरावर पहिले पेरीजी पार केले. या कक्षेत राहण्याचा कालावधी १३ दिवसांचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा आगामी मोहिमांचे नियोजन करताना होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top