चर्चगेट- विरार दरम्यान धावणार आता १५ डब्यांची धीमी लोकल

मुंबई- पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आता चर्चगेट-विरारदरम्यान प्रथमच १५ डब्यांची धीमी लोकल सुरू करण्याची पश्चिम रेल्वे प्रशासनाची योजना असून आवश्यक पायाभूत सुविधा वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिली.

चर्चगेट- विरार दरम्यान १५ डब्यांची धीमी लोकल सुरू करण्यासाठी चर्चगेट-अंधेरी दरम्यानच्या स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत असून १५ डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या १५ डब्यांच्या १९९ लोकल अंधेरी-विरार दरम्यान धीम्या आणि चर्चगेट-विरार दरम्यान जलद धावतात. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने चर्चगेट-अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या होत नाहीत. त्यामुळे धीम्या मार्गावरील १२ डबे असलेल्या लोकल गाड्यांमध्ये गर्दी असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता लोकलचे १५ डबे वाढवण्याची गरज होती. त्यासाठी चर्चगेटपर्यंतच्या सर्व फलाटांची लांबी वाढवण्याची योजना आहे.
१५ डबे असलेल्या लोकल ट्रेनसाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याआधी चर्चगेट-अंधेरी दरम्यानच्या प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण शक्य आहे का, याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top