चीनने बांधलेल्या विमानतळाचा ताबा आता भारतीय कंपनीकडे

कोलंबो – श्रीलंकेतील प्रकल्पांसाठी भारत आणि चीनमध्ये सातत्याने स्पर्धा सुरू आहे. चीनने श्रीलंकेत २०.९ कोटी डॉलर खर्च करून मत्ताला आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवले होते. मात्र या विमानतळाचे नियंत्रण आता भारत आणि रशियन कंपन्यांच्या हातात गेल्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे.

मत्ताला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियंत्रण भारतीय आणि रशियन कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला असल्याची माहिती उघड झाली आहे. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प भारताकडे दिला जाऊ शकतो अशी चीनला पुसटशीही कल्पना नसल्यामुळे मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे पडसाद चीनमध्ये उमटले. मत्ताला विमानतळ हे बंदरांचे शहर हंबनटोटाच्या जवळ आहे. हंबनटोटा हे श्रीलंकेने चीनला ९९ वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिले आहे. असे असताना आता या बंदराजवळचे विमानतळ भारतीय कंपनीला दिले जाणे महत्त्वाचे मानले जाते आहे. आता हा विमानतळ भारतीय कंपनी शौर्य एरोनॉटिक्स प्रा.लि आणि रशियाची रिजन्स मॅनेजमेंट कंपनीकडे ३० वर्षांच्या मुदतीसाठी सोपवण्यात आला आहे. यामुळे आता चीनकडून काही आगळीक करण्याच्या प्रयत्नांवर नजर ठेवणे भारताला शक्य होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top