चैत्यभूमीवर भीम शक्तीचा निळा महासागर उसळला

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर आले होते. चैत्यभूमीवर जणू भीम शक्तीचा निळा महासागरच उसळला होता . राज्यपाल रमेश बैस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री , केंद्रीय मंत्री रामदास आठवले , प्रकाश आंबेडकर , रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटाचे नेते यांनी सकाळीच चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबाना अभिवादन केले. महापरिनिर्वाणदिना निमित्त चैत्यभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती .
महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी, शिवाजी पार्कवर मोठा मंडप उभारण्यात आला होता. तेथे पिण्याच्या पाण्यापासून शौचालयापर्यंत, पालिकेने सर्व सोइ उपलब्ध करून दिल्या होत्या . त्यासाठी पालिकेचे ६ हजार कर्मचारी व अधिकारी चैत्यभूमीवर ५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच सर्व सेवा सुविधावर लक्ष ठेऊन होते. मध्यरात्री १ वाजल्यापासून दर्शनासाठी जवळपास ४ किमीची रांग लागली होती. सर्वाना शिस्तीने दर्शन घेता यावे म्हणून पोलीस ,तसेच समता सैनिकदलाचे कार्यकर्ते मार्गदर्शन करताना दिसत होते. आज चैत्यभूमीवर अनेक अनेक स्टॉल लागलेले होते. त्यात बाबासाहेब आंबेडकर आणि दलित चळवळीशी संबंधीत अनेक पुस्तके ठेवण्यात आली होती . काही ठिकाणी बाबासाहेबांच्या जुन्या मूकनायक आणि इतर साप्ताहिके व मासिकांचे अंक ठेवण्यात आले होते . ते खरेदी करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळली होती. काही स्टॉलवर बाबासाहेब व भगवान बुद्धांच्या आकर्षक मूर्ती दिसत होती.तसेच बाबासाहेबांच्या जीवनावरील गाण्याच्या सीडीज ठेव्यात आल्या होत्या. महापरिवर्तन दिनानिमित्त मोठ्या संख्येने देशभरातून अनुयायी येत असल्याने, त्यांच्यासाठी सामाजिक संघटनांनी सकाळच्या उपहाराची तसेच दुपारच्या व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यांचे व्यवस्थित वाटपही केले जात होते. चैत्यभूमीवर आंबेडकर चळवळीतील काही गायकांचे गायनाचे कार्यक्रमही दिसत होते. तिथे भीमसैनिकांनी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी शिवाजी पार्कवर आंबेडकरी चळवळीतील वेगवेगळ्या पक्षांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिन व्यवस्थित पार पडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top