छगन भुजबळांविरोधातील आरोपांवर कारवाई कधी?

मुंबई :अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या आरोपांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल केली. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार, विधिमंडळात दिलेल्या आश्वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार, अशी विचारणा करणारी याचिका अंजली दमानिया यांनी केली आहे.
गैरव्यवहाराच्या आरोपानंतर सत्र न्यायालयाने भुजबळ, त्यांचे पुतणे समीर भुजबळ आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे विकसक मेसर्स चमणकर यांना दोषमुक्त केले होते. मात्र, या निकालावर अंजली दमानियांनी आक्षेप घेतला होता.अंजली दमानिया यांनी सरन्यायाधीशांकडे याबाबत तक्रार केली होती. दमानिया यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात संबंधित न्यायाधीशांची बदली केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाने या संदर्भात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र, नंतर तो शासननिर्णयही रद्द करण्यात आला होता. यामुळे अंजली दमानिया यांनी थेट कोर्टात धाव घेत भुजबळांवरील आरोपांचे काय झाले, सरकार भुजबळांवरील आरोपांची चौकशी कधी करणार, अशी विचारणा केली आहे. सत्तेचा भाग झाल्यानंतर चौकशी थांबत तर नाही ना, असा प्रश्नही दमानियांनी केला. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार संदर्भातील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करा, या दमानियांच्या मागणीची प्रवर्तन संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू असून त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न दमानियांनी केला आहे. दरम्यान, माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारले असता, याबाबत काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top