छत्तीसगडमधून अयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत ट्रेन

  • छत्तीसगड सरकारची घोषणा

रायपूर

अयोध्येतील राम मंदिर सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त छत्तीसगडहून अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी छत्तीसगड सरकारने मोफत ट्रेनची घोषणा केली आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी प्रत्येक भाविकाला जाता यावे, यासाठी छत्तीसगड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वार्षिक मोफत रेल्वे प्रवास योजनेला मंजुरी देण्यात आली. या ट्रेनमधून छत्तीसगडमधील २० हजारांहून अधिक भाविक अयोध्येत जाऊ शकतील. या योजनेसाठी १८ ते ७५ वयोगटातील वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त व्यक्तींची निवड केली जाणार आहे. प्रवाशांच्या निवडीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. छत्तीसगड पर्यटन मंडळाच्या अध्यक्षतेखाली लवकरच ही योजना सुरू केली जाणार आहे. राज्य पर्यटन विभाग या योजनेचे बजेट प्रदान करेल. या रेल्वेप्रवासादरम्यान यात्रकरूंच्या जेवणाची व्यवस्था आयआरसीटीसीतर्फे केली जाणार आहे. रायपूर, दुर्ग, रायगड आणि अंबिकापूर स्थानकांवरून यात्रेकरू या ट्रेनमध्ये चढू शकतात. छत्तीसगड ते अयोध्या हा प्रवास सुमारे ९०० किमीचा आहे. यात शेवटचे स्टेशन अयोध्या असेल. यात्रेकरू वाराणसीमध्ये रात्रभर विश्रांती घेऊ शकतील. त्यानंतर त्यांना काशी विश्वनाथ मंदिरात नेले जाणार आहे आणि गंगा आरतीमध्ये सहभागीसुद्धा होता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top