जगज्जेतेपदाची हुलकावणीच! ऑस्ट्रेलिया ‘हेड’मास्टर!

तब्बल एका तपानंतर तिसरे विश्‍वविजेतेपद जिंकण्याचे भारताचे स्वप्न रविवारी भंगले. संपूर्ण स्पर्धेत भक्कम फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि प्रेक्षणीय क्षेत्ररक्षण अशी अव्वल नंबरी वर्चस्वपूर्ण कामगिरी साधणार्‍या भारताचा 10 विजयांचा अश्‍वमेध ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात रोखला. ट्रॅव्हिस हेडने ‘हेड’मास्टरप्रमाणे कर्तृत्व दाखवत ऑस्ट्रेलियाला 42.6 षटकांत सहा गडी राखून शानदार विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातल्यामुळे अनोखा जल्लोष केला, तर देश शोकसागरात बुडाला.
25 जून 1983 रोजी कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्‍वविजेतेपद जिंकून दाखवले. मग 2 एप्रिल 2011 या दिवशी 28 वर्षांनी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हा पराक्रम दुसर्‍यांदा दाखवला. परंतु रोहित शर्माच्या भारतीय संघाला हे यश तिसर्‍यांदा मिळवण्यात अपयश आले. 2003 नंतर 20 वर्षांनी पराभवाची पुनरावृत्ती झाली आणि ऑस्ट्रेलियाने विश्‍वविजेतेपदाच्या लढतीत भारताला चारी मुंड्या चीत केले. ग्लेन मॅक्सवेलने सिराजच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यंदाच्या विश्‍वचषकात पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा एकंदर प्रवास थक्क करणारा होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत भारतीय फलंदाजांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले. भारताचा डाव 50 षटकांत 240 धावांपर्यंत मर्यादित ठेवला. के. एल. राहुल (66), विराट कोहली (54) आणि रोहित शर्मा (47) या तीन फलंदाजांनाच मैदानावर टिकाव धरता आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरे बसल्यानंतरही हेडने 120 चेंडूंत 15 चौकार आणि 4 षटकारांनिशी 137 धावांची खेळी साकारून ऑस्ट्रेलियाचा विजयाध्याय लिहिला. याच हेडमुळे ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवण्याचा पराक्रम दाखवला होता. यावेळी हेडला मार्नस लबूशेनने नाबाद 58 धावा करीत उत्तम साथ दिली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही तेच अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात मैदानावर धावांच्या अभियानाला प्रारंभ केल्यावर मैदानाचा अंदाज येत गेला आणि आक्रमणाऐवजी बचावात्मक फलंदाजी करीत मैदानावर टिकण्याचा फलंदाजांचा प्रयत्न सुरू झाला.
सलामीवीर शुभमन गिलने (4) निराशा केली. पण रोहितने नेहमीप्रमाणेच हवाई फटके खेळत चार चौकार आणि तीन षटकारांनिशी 31 चेंडूंत 47 धावा केल्या. रोहित आणि कोहली यांनी तिसर्‍या गड्यासाठी 46 धावा केल्या. पण मॅक्सवेलला उंच फटका खेळण्याचा प्रयत्न रोहितचा प्रयत्न फसला आणि ट्रॅव्हिस हेडने त्याचा अप्रतिम झेल घेतला. या धक्क्यातून सावरण्याआधीच श्रेयस अय्यर (4) माघारी परतला. पण कोहली आणि राहुल यांनी चौथ्या गड्यासाठी 67 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत संघाला दीड शतकापर्यंत नेले. पण कमिन्सनेच कोहलीचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला दिलासा दिला.
मग ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. सूर्यकुमार यादवने संयमी रूप धारण करीत 28 चेंडूंत फक्त 18 धावा काढल्या. भारताच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर कुलदीप यादव (10) धावचीत झाला.
भारताने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 80 धावा केल्या. पण नंतरच्या प्रत्येक टप्प्यात धावांचा हा वेग कमी झाला. त्यामुळे भारताला अडीचशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 55 धावांत तीन बळी घेतले. तर हेजलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. यष्टीरक्षक जॉश इंग्लिसने पाच बळी घेत महत्त्वाचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही खराब झाली. संपूर्ण स्पर्धेत ‘बळीराजा’ म्हणून नावलौकिक मिरवणार्‍या मोहम्मद शमीने दुसर्‍याच षटकात डेव्हिड वॉर्नरला (7) कोहलीद्वारे झेलबाद करीत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मग जसप्रीत बुमराने मिचेल मार्श (15) आणि स्टीव्ह स्मिथला (4) तंबूची वाट दाखवत भारताला दिलासा मिळवून दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 3 बाद 47 अशी अवस्था झाली. भारतीय गोलंदाज पुन्हा आपले वर्चस्व दाखवतील, अशी आशा भारतीय चाहत्यांमध्ये निर्माण झाली. पण हेड आणि लबूशेन यांनी भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले. विकेट न गमावता चिवट झुंज दिली. 192 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाच्या विश्‍वविजेतेपदासाठी आश्‍वासक प्रयत्न केले. हेडने गरजेनुसार आक्रमक फटकेसुद्धा पेश केले. विजय दृष्टिपथास आला, तेव्हा सिराजने हेडचा बळी मिळवला. पण लबूशेन कसोटी क्रिकेटला साजेसा खेळला. त्याने 110 चेंडूंत 58 धावा करताना फक्त चार वेळा चेंडू सीमापार धाडला. भारताकडून बुमराने 43 धावांत दोन बळी घेतले, तर शमीने एक बळी मिळवला. अन्य गोलंदाजांनी मात्र निराशा केली.
दिग्गजांची उपस्थिती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस, माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी, गायिका आशा भोसले, अभिनेता शाहरुख खान, डगुबत्ती वेंकटेश, रणवीर सिंग, आयुष्मान खुराणा, आर्यन खान, दीपिका पदुकोण, आदी दिग्गजांनी या अंतिम सामन्याला उपस्थिती राखली.
रोहितचा विक्रम
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आजच्या सामन्यात 31 चेंडूत 47 धावा केल्या. या तडाखेबंद खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या षटकारांसह रोहित एक दिवसीय सामन्यात एका प्रतिस्पर्धी देशांविरुद्ध सगळ्यात जास्त षटकार (86) ठोकणारा फलंदाज बनला. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला.

सचिनकडून खास भेट!
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याच्या काही मिनिटे आधी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला आपल्या अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याची जर्सी भेट म्हणून दिली. या जर्सीवर सचिनची स्वाक्षरीसुद्धा आहे. यासोबतच्या शुभेच्छापत्रात विराट, तुझा आम्हाला अभिमान आहे असे लिहिले आहे. कोहलीने नुकताच सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमधील 49 शतकांचा विश्‍वविक्रम मोडीत काढला.

शमीची आई आजारी
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याच्या निकालापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आईची तब्येत अचानक बिघडली. यानंतर शमीच्या आईला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातील स्थानिक डॉक्टरांच्या उपचाराचा काहीच फायदा न झाल्याने कुटुंबियांनी त्यांना मुरादाबादच्या सुपरटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शमीची चुलत बहीण डॉ. मुमताज यांनी सांगितले की, ताप आणि अस्वस्थतेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. एक दिवस आधीच शमीच्या आईने भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती.

प्रेक्षणीय ‘सूर्यकिरण’
सामना सुरू होण्याआधी भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ पथकाने आकाशात 10 मिनिटे प्रेक्षणीय कवायती करीत सर्वांची मने जिंकली. भारतातील क्रिकेट सामन्याप्रसंगी प्रथमच अशा प्रकारे हवाई दलाचे सादरीकरण झाले. हॉक एमके-132 स्कॅट प्रकारची नऊ लढाऊ विमाने यात सामील झाली.

नेत्रदीपक लाइट
अँड लेसर शो

नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन इनिंग्जच्या मध्यंतरात मनोरंजनाचा शानदार शो पार पडला. यात आकाश सिंग आणि नकाश अझिझ यांनी टायगर थ्री चित्रपटातील लेके प्रभूका नाम हे गाणे गायले तर संगीतकार प्रीतम यांनी 83 या चित्रपटातील जीतेगा जीतेगा आणि लहरा दो ही दोन गाणी गायली. वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या दहा देशांचे झेंडे हातात घेऊन नर्तकांनी नृत्याविष्कारही सादर केला. यानंतर 90 सेकंदाचा लेसर अँड लाइट शो झाला. त्यात दिल जश्‍न बोले या वर्ल्डकप अँथमवर उजळलेल्या रिंग ऑफ फायरने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कोहली स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
विराट कोहली स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने 11 डावांत 765 धावा काढल्या. यात तीन शतकांचाही समावेश होता. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top