जगभरात कुठेही मोबाईल नेटवर्क? मस्क यांचा स्पेसमध्ये मोबाईल टॉवर!

वॉशिंग्टन

एक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे स्टारलिंकने आता नव्या सॅटेलाईटच्या माध्यमातून थेट मोबाईल टॉवरच अवकाशात लाँच केला आहे. जगभरात कुठल्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठी इलॉम मस्क यांनी ही मोहिम हाती घेतली आहे.

स्पेसएक्सने नुकतेच अवकाशात २१ नवे हायटेक उपग्रह लाँच केले आहेत. यापैकी ६ उपग्रह हे इनोव्हेटिव्ह ‘डायरेक्ट टू सेल’ सेवेला सपोर्ट करण्यासाठी तयार केले आहेत. याबाबत मस्क यांनी २०२२ साली घोषणा केली होती. ही मोहीम यशस्वी झाल्यास सुरुवातीला अमेरिकेत टी-मोबाईल नेटवर्क असणाऱ्या ४जी-एलटीएई फोनवर याची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर यातच टेक्स्ट मेसेजिंग सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती स्पेसएक्सने दिली. याबाबत मस्क यांनी सांगितले की, सध्या या माध्यमातून केवळ टेक्स्ट मेसेजची चाचणी घेण्यात येणार आहे. २०२५ च्या शेवटपर्यंत मेसेज सोबतच व्हॉईस कॉल, डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्स अशा सेवाही या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. या मोहिमेमुळे जगभरात कुठेही मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या नेटवर्क्सना मात्र यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top