टोकियो – भ्रष्टाचार आणि चुकीच्या आर्थिक धोरणांच्या आरोपांमध्ये घेरलेले जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पुढील महिन्यात आपण पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली.पंतप्रधानपदाच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत किशिदा यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यातच डॉलरच्या तुलनेत जपानी येन घसरल्याने किशिदा यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव आहे. सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर किशिदा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केला. पुढील महिन्यात होत असलेल्या सत्ताधारी लिबरल डेमॉक्रेटीक पार्टीच्या (एलडीपी) नेतेपदाच्या निवडणुकी साठी आपण उमेदवारी दाखल करणार नाही,असेही किशिदा यांनी स्पष्ट केले. एलडीपी पक्ष आता बदलला आहे याचे संकेत जनतेमध्ये जाणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून आपण पंतप्रधानपदावरून दूर होणार असल्याचे किशिदा यांनी सांगितले.
