जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी १०० इमारतींना आग! ३० मृत्यू

टोकियो

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले. भकंपाच्या या तीव्र धक्क्यात जवळपास ३० नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच भूकंपामुळे १०० हून अधिक इमारतींना आग लागली, तर १९ जणांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिली. या भूकंपानंतर तीव्र त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. हा इशारा मागे घेण्यात आला असला, तरी किनारपट्टी भागांतील नागरिकांना अद्याप त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या धक्क्यांनी ३० नागरिकांचा मृत्यू झाला, तर १९ जणांना कार्डिअॅक अरेस्ट आला. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर किनारपट्टी भागांतील सुमारे १ लाख नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. वाजिमा शहरांत भूकंपाचे मुख्य केंद्र होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास इशिकावाच्या किनाऱ्याजवळ आणि आसपासच्या प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक अंदाजानुसार यापैकी सर्वात मोठा धक्का ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. लोकांना छतांसारख्या उंच भागात जाण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे मध्यवर्ती वाजिमा सिटी, इशिकावा प्रीफेक्चरमध्ये १०० हून अधिक इमारतींना आग लागली होती. तर, या इमारतींमध्ये अनेक लाकडी दुकाने आहेत. भूकंप आणि त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली. भूकंपानंतर इशिकावा आणि तोयामा प्रांतात वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे ३६ हजार हून अधिक घरांची वीज गेली आहे. येत्या काही दिवसांत जपानमध्ये भूकंपाचे आणखी धक्के जाणवण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top