‘जय भवानी’ शब्द काढा! आयोगाचा आदेश उद्धव ठाकरे भडकले! शब्द वगळण्यास नकार

मुंबई – उबाठा सेनेचे नवे प्रचार गीत नुकतेच प्रसिद्ध झाले. या प्रचारगीतात कोरस मध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे नारे आहेत. शिवाय ‘हिंदू हा माझा धर्म, जाणून घे हे मर्म’ असे आवाहन आहे. या दोन्हीना निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेले उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आयोगाला आव्हान देत ‘शब्द काढणार नाही, जे करायचे ते करा’ असा पवित्रा घेतला.
उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्ही प्रचार गीत – मशाल गीत काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले. यात ‘हिंदू हा माझा धर्म, जाणून घे हे मर्म’ असे वाक्य आहे, आम्ही यातून हिंदू धर्माच्या आधारे मत मागितलेले नाही. तरीही निवडणूक आयोगाने पत्र पाठवून ‘हिंदू धर्म’, हे शब्द वगळण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे तर या गीताच्या पार्श्‍वभूमीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा कोरस आहे. त्यातील जय भवानी हा शब्दही वगळण्यास सांगितले आहे. भवानी माता ही महाराष्ट्राची कुलदैवत आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा प्रत्येकाच्या हृदयात आहे. आई तुळजाभवानीचे स्मरण करणे हा गुन्हा आहे का? आम्ही कुठेही धर्माच्या नावाने मते मागितलेली नसताना आयोगाने हा आदेश दिला? आम्ही हा आदेश पाळणार नाही. ‘जय भवानी’ हे शब्द अजिबात वगळणार नाही.
उद्धव ठाकरे यांनी आयोगाला सवाल करीत म्हटले की, काही काळापूर्वी तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत्या. त्यावेळी कर्नाटकच्या सभेत पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत म्हटले होते की, बजरंगबली बोला आणि भाजपाला मत द्या. अमित शहा तर एका सभेत म्हणाले की, तुम्हाला सर्वांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे, पण त्यासाठी खर्च आहे, पण तुम्ही भाजपाला विजयी केले तर आम्ही तुम्हाला अयोध्येला मोफत नेऊ, त्याचवेळी आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत तक्रार केली होती. धर्माच्या नावाने मते मागायला परवानगी आहे असा कायद्यात बदल केला आहे का? नसेल केला तर या दोघांवर कारवाई का करीत नाही? असे आम्ही विचारले होते. त्यावर निवडणूक आयोगाचे अजून उत्तर आलेले नाही. आता जय भवानी शब्द काढला नाही म्हणून आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्याआधी मोदी आणि अमित शहांवर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक आयोग म्हणते की, आमच्या सर्व नेत्यांच्या बॅगा तपासणार आहे हरकत नाही. पण मग मोदी आणि अमित शहांच्याही बॅगा तपासायला हव्या. आता हा नवा वाद किती पेटतो हे बघायला लागेल.
मुलाखतीचा विषय नको
उध्दव ठाकरेंना पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्याच्या कालच्या मुलाखतीच्या बाबतीत विचारले तेव्हा त्यांनी हा विषय टाळत कालचा विषय काल संपला, तो विषय नको असे म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top