मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात आजही तोडगा निघाला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय आणि शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेऊन दिलेले प्रस्ताव जरांगे यांनी फेटाळून लावले. जरांगे यांनी स्पष्ट केले की, हैदराबाद आणि सातारा गॅझेट प्रमाणित करून मराठवाडा व सातारा येथील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, हा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही. जर येत्या शुक्रवारपर्यंत निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रातील सर्व महिला व मुले मुंबईला पोहोचतील. यामुळे आता सरकारपुढे मोठे संकट उभे आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे मात्र आज दुपारपर्यंत अमित शहा यांच्यासह गणेश दर्शनात व्यग्र होते.
काल आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी रात्री झालेल्या हालअपेष्टांमुळे मराठा आंदोलकांनी आज सकाळी महापालिकेसमोरचा रस्ता अडवला. रस्त्यावरच ठिय्या दिला, मुंडन आंदोलन केले, रस्त्यावर आंघोळ केली, घोषणा दिल्या, बस अडवली, अडकलेल्या बेस्ट बसवर चढले. गेटवे ऑफ इंडिया येथेही आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते. सीएसएमटी स्थानक तर त्यांनी कालपासून काबीजच केले आहे. आज तिथे शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले. ठाणे, पूर्व द्रुतगती मार्ग येथे त्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती.
सीएसएमटी व पालिकेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलक जोरदार घोषणा देत होते. काल खाऊगल्ल्या , हॉटेल बंद केल्याने त्यांचे हाल झाल्याने आंदोलक भडकले होते . पोलीस अधिकारी अभिनव देशमुख यांनी समजूत घालूनही आंदोलक खाऊगल्ल्या सुरू करण्याच्या मागणीवर ठाम होते. रात्रभर मुंबईतल्या पावसात हाल झालेल्या आंदोलकांचा संताप काहीकेल्या कमी होत नव्हता.
आजचा दिवस गाजला तो पहिल्या दिवशी झालेल्या आंदोलकांच्या हालअपेष्टांमुळे. सर्वत्र याचीच चर्चा होती. आंदोलकांची धडकी भरवणारी गर्दी बघून पोलीस प्रशासन हतबल दिसत होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी केवळ एखाद्या निरीक्षकासारखे आंदोलकांच्या घोषणा, त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह, सरकारविरोधातला रोष बघत होते. हम सब जरांगे, लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांसोबतच आंदोलक हे देवेंद्र फडणवीसांविरोधात जोरदार नारे देत होते. जरांगे पाटील यांनीही सकाळीच आपल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांच्या या संतापाला वाट करून दिली. जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशावरूनच महापालिका आयुक्तांनी आमच्या मराठा आंदोलकांचे पाणी बंद केले. बाथरूम बंद केले. दुकाने बंद केली. पालिका आणि सीएसएमटी परिसरात जमलेल्या आंदोलकांना विनंती आहे की हे मुद्दाम केले जात आहे. पण तुम्ही संयम सोडू नका. तुमचे हाल होत आहेत, तर थोडे हाल होऊ द्या. मी पोलिसांना सांगतो की, पोरांना डिवचू नका. विनाकारण ताण देऊ नका.
दरम्यान,मुंबईत खाण्यापिण्याची आबाळ होते आहे , असा निरोप राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये गेला. त्यामुळे मुंबईला शिदोरी पाठवण्यासाठी राज्यभरातून आयाबहिणी सरसावल्याचे दिसले. ठिकठिकाणी भाकरी, चटणी, लोणचे अशी शिदोरी तयार करण्याची लगबग दिसली.
इकडे जरांगे पाटलांनी इशारा देऊनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील आंदोलकांचा रोष काही कमी होत नव्हता. प्यायला पाणी नाही. खाऊगल्ल्या बंद असल्याने पोटात कावळे ओरडूनही भूक काही शमली नाही. काहीजण प्रशासनाकडेही पाण्याची सोय करावी, अशा विनवण्या करत होते. पैसे हवे असतील, तर जमा करू देऊ, पण आमची तहान भागवा, असेही आंदोलकांचे म्हणणे होते. लघुशंका करण्यासाठीही स्वच्छतागृहांची सोय नसल्याने काहीजण रस्त्यावरच लघुशंका करत होते. सीएसएमटीमधील स्वच्छतागृहात रांगच्या रांग लागली होती. त्यामुळे आझाद मैदानासह सीएमएमटी परिसरात नेते जरांगे पाटील यांच्या आंदोलनासोबतच आंदोलकांचीही पोटआंदोलने सुरू होती. फडणवीस सरकारच्या निषेधार्थ कुणी अर्धनग्न होऊन आपला संताप व्यक्त केला, तर कुणी थेट रस्त्यावरची वाहतूकच रोखून धरली. क्रॉफर्ड मार्केटहून सीएसएमटीच्या दिशेने येणार्या वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला. जरांगे पाटील यांच्या आंदोलकांच्या समन्वयकांनी या तरुणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांचा रोष काही कमी झाला नाही. काहीजण चक्क वाहतूक कोंडीत अडकलेल्या बेस्टच्या बसवरही चढले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत समजासमजवी करत होते.
अखेर खाऊगल्ल्या सुरू करण्याबद्दल प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आंदोलक महापालिकेच्या रस्त्यावरून उठले. सीएसएमटी स्थानक, बीएमसी इमारत परिसर आणि आझाद मैदान अशा तीन ठिकाणी आंदोलनाशी संबंधित घडामोडी सतत सुरू होत्या. सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांची गर्दी वाढतच होती. सीएसएमटी स्थानकाकडे जाण्यासाठी हार्बर मार्गावरील स्थानकावरून आंदोलकांचे जत्थेच्या जत्थे लोकलमध्ये शिरत होते. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्ब्यांमध्येही आंदोलक शिरत होते. महिलांसाठीचा डब्बा आहे, हे लक्षात आणून दिल्यावर ते दुसर्या डब्ब्यात जायचे. सीएसएमटीवर हार्बरवरून एखादी लोकल यायची तेव्हा आंदोलकांचे जत्थे कसे हाताळायचे, अशा संभ्रमात पोलीस निव्वळ बघ्यासारखे थांबून होते. काहीजण शिट्ट्या वाजवत होते. संपूर्ण स्थानक टोप्या, गमछे यांनी भगवेमय झाले. लोकल स्थानकात लागत असतानाच आंदोलकांच्या घोषणा सुरू व्हायच्या. जसजसे हे जत्थे उतरू लागत तसा घोषणांचा आवाज वाढायचा. संपूर्ण परिसरात केवळ पोलिसांच्या शिट्ट्या आणि आंदोलकांच्या घोषणा यांचाच गोंगाट होता.
सीएसएमटी स्थानकातून आझाद मैदानाकडे जाणार्या भुयारात तर चेंगराचेंगरीसदृश्य गर्दी होत होती. शेकडो आंदोलकांचा बंदोबस्त करणार्या आझाद मैदान चौकीतील पोलिसांमध्ये मराठ्यांचे आंदोलन कसे हाताळणार, अशी प्रश्नार्थक कुजबुज सुरू होती. आजचा दिवस फडणवीस सरकारविरोधात पहिल्या दिवशी न दिसलेल्या रोषाला वाट मोकळी करून देणारा होता. बघ्याच्या भूमिकेतले हतबल पोलीस प्रशासन हेही आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. काही अतिउत्साही तरुण कॅमेरा बघून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करत होते. उद्या रविवारी हार्बर मार्गावर वाशी ते कुर्ला यादरम्यान मेगाब्लॉक आहे. त्यामुळे आंदोलक आझाद मैदानावर कसे येणार हा प्रश्न आहे. कारण हार्बर मार्गावरच आंदोलकांची मोठी येजा सुरू आहे. दुसरीकडे रविवारचा दिवस असल्याने राज्यभरातून मराठा आंदोलकांचे नवे जत्थे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मैदानाबाहेर पोटआंदोलने सुरू असताना तिकडे मैदानावर पावसाने सर्वत्र चिखल झाला होता. आपल्या मागण्यासाठी आंदोलकांनी चिखलामध्येच ठाण मांडले. इथे राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले आंदोलक हे नेते जरांगे पाटील यांच्या स्टेजजवळ जाण्यासाठी धडपडत होते. स्टेजजवळ जाऊन आपल्या सेल्फीत जरांगे पाटील यांची छबी काढण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलकांची सोय करण्यासाठी दुपारी काही भागात मैदानावर प्लॅस्टिकचे चवाळे अंथरण्यात आले.चिखलामुळे मैदानावर थांबायलाही जागा नसल्यामुळे आंदोलकांची सतत येजा सुरू होती. काहीजण रस्त्यावरच महापालिकेने लावलेल्या टँकरवरच आंघोळ केली. संपूर्ण परिसरात आंदोलकांनी आपापली वाहने मिळेल तिथे लावली. फूटपाथ, रस्त्याच्या कडेला सर्वत्रच गाड्याच गाड्या होत्या. जणुकाही फूटपाथला तात्पुरत्या राहुट्यांचे स्वरूप आले होते. डिव्हायडरवर ओले कपडे वाळवण्यासाठी टाकले होते.
सीएसएमटी, आझाद मैदान परिसरात खाण्यापिण्याची सोय नसल्याने आंदोलक संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात पांगलेले दिसले. सरकारने नेमलेल्या आरक्षण समितीकडे तक्रार पोहोचल्यावर दुपारनंतर फॅशन स्ट्रीट येथे 236 मोबाईल टॉयलेट आणण्यात आले. 2 रुग्णवाहिका , अग्निशमन दलाने रात्री वीजेची व्यवस्था केली .
नागपुरात ओबीसींचे
साखळी उपोषण सुरू
नागपूर- ओबीसी आरक्षण कुणालाही देऊ नये, या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू झाले. विशेष म्हणजे, या आंदोलनात काँग्रेसचे खासदार-आमदारांसोबतच भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख आणि परिणय फुकेही सहभागी झाले आहेत. यावेळी बबनराव तायवाडे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू केले आहे. 43 वर्षांच्या संघर्षानंतर मंडल आयोगातून ओबीसींना न्याय मिळाला. सरकारने आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. मात्र, मराठा समाजाच्या दडपणाखाली काही चुकीचा निर्णय झाला, तर आम्हीही गप्प बसणार नाही. गरज पडल्यास थेट मुंबई गाठू.
