जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयलांना जामीन मंजूर

मुंबई

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. गोयल हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. आरोग्याच्या समस्येच्या आधारे न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला. मात्र, न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने त्यांना विविध अटीशर्ती घातल्या.

” गोयल यांना एक लाख रुपयांचा जामीन भरावा लागेल आणि न्यायचौकशी न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुंबई सोडता येणार नाही. उच्च न्यायालयाने गोयल यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा. गोयल यांची दोन महिन्यांच्या अंतरिम जामिनावर सुटका होईल. मात्र त्यांना न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागेल,” असे न्यायमूर्ती एनजे जमादार यांनी सांगितले. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल दोघेही कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांनी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. फेब्रुवारीमध्ये, विशेष न्यायालयाने गोयल यांना जामीन देण्यास नकार दिला होता, परंतु त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी दिली होती. यानंतर गोयल यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गुणवत्तेच्या आधारावर जामीन आणि वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर सुटकेची मागणी केली. गोयल यांचे वकील हरीश साळवे यांनी मानवतावादी आधारावर या खटल्याचा विचार करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यावेळी ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी जामीनाला विरोध केला आणि गोयल यांची रुग्णालयात भरती राहण्याची मुदत वाढवल्यास एजन्सीला कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले.

दरम्यान, गोयल यांना सप्टेंबर २०२३ मध्ये ईडीने मनी लाँड्रिंगच्या आणि कॅनरा बँकेने जेट एअरवेजला दिलेल्या ५३८.६२ कोटी रुपयांच्या कर्जामध्ये हेराफेरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यावर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांच्या पत्नीला देखील अटक करण्यात आली. त्यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी जामीन मंजूर केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top